१,६५२ जलस्रोतांची रासायनिक पाणी नमुने तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:13 AM2024-05-21T11:13:33+5:302024-05-21T11:14:12+5:30
Amravati : पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाची मोहीम; ग्रामपंचायतींना मिळणार कार्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १,६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात जलस्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांनी दिली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मान्सूनपूर्व स्रोतांची रासायनिक तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने जलसुरक्षा रक्षक, गावातील पाच महिला आरोग्यसेवक, आरोग्य सहायकांच्या सहकार्याने गोळा केले जात आहेत. संकलित पाणी नमुन्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेतून केली जाणार आहे.
तालुकानिहाय पाणीपुरवठा स्त्रोतांची संख्या
अचलपूर तालुक्यात १००, अमरावती १०९, अंजनगाव सुर्जी १२, भातकुली ७०, चांदूर बाजार ८०, चांदूर रेल्वे १२०, चिखलदरा २५९, दर्यापूर १३, धामनगाव रेल्वे ११७, धारणी २४१, मोर्शी १०२, नांदगाव खंडेश्वर १८८, तिवसा ११० व वरूड तालुक्यात १३१ जलस्त्रोतांची संख्या आहे.
गुणवत्ताधारित जोखीम निश्चिती
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात ९ आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित केली जाणार आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होते. त्यावर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत उपाययोजना करू, नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.
- संतोष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
कार्डाचे निकष असे
लाल कार्ड : पाणी शुद्धीकरणात अनियमितता, जलस्रोताचा परिसर अस्वच्छ, नळ गळती, टीसीएल पावडर साठ्याची उपलब्धता नसणे, वर्षभरात साथरोगाचा उद्रेक, सर्वेक्षणात ७० व ७० पेक्षा जास्त गुणानुक्रमानुसार तीव्र जोखीम म्हणून स्रोत निश्चित. २
हिरवे कार्ड : ज्या ग्रामपंचायतीमध्ये लाल कार्डचे निकष आढळून येत नाहीत, त्यांना हिरव्या रंगाचे कार्ड दिले जाते.
पिवळे कार्ड : गावांमध्ये अस्वच्छता, स्वच्छता सर्वेक्षणात ३० व ६५ यांमध्ये गुणानुक्रम, मध्यम जोखीम म्हणून स्रोत निश्चित.