अमरावतीत शाळांमधूनही दिले जातात बुद्धिबळाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:30+5:302021-07-20T04:10:30+5:30
अमरावतीत झाली होती राष्ट्रीय स्पर्धा : विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद इंदल चव्हाण- अमरावती : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा अमरावती येथे १९९० ...
अमरावतीत झाली होती राष्ट्रीय स्पर्धा : विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
इंदल चव्हाण-
अमरावती : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा अमरावती येथे १९९० च्या दशकात घेण्यात आली. तेव्हा आंध्र प्रदेशातील नेत्रतज्ज्ञ प्रकाश रेखावार यांनी या खेळाचा प्रसार अमरावती शहरात केला. मुलांना याचे प्रशिक्षण दिले. या खेळाविषयी आत्मियता निर्माण करण्याचे काम त्यांनी केल्याची प्रतिक्रिया कँडिडेट मास्टर पवन डोडेजा यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या औचित्याने दिली. आता तर येथील काही शाळांमधूनही बुद्धिबळपटू घडविण्याचे काम होत आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना २० जुलै १९२४ रोजी झाली. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन दरवर्षी २० जुलैला साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना युनेस्कोने प्रस्तावित केली होती आणि ती फिडने स्थापन केल्यापासून साजरी केली जात आहे. अमरावती शहरात आधी बुद्धिबळ मोजकेच लोक खेळायचे. मात्र, राष्ट्रीय स्पर्धा झाली तेव्हा डॉ. प्रकाश रेखावार हे अमरावतीत समर्थ ऑप्टिकलमध्ये नेत्रतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक मुलांना या खेळाचे महत्त्व पटवून मार्गदर्शन केले. या खेळाबद्दल आत्मीयता निर्माण केली. अनेकांना प्रशिक्षित केल्यानंतर आता अमरावती शहरातील अनेक पालक आपल्या पाल्यांना या खेळात सहभागी केले आहे. तसेच काही शाळांमध्ये व जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोअर हॉलमध्येही याचे क्लासेस घेण्यात येतात. मात्र, कोरोनाकाळात ही क्लासेस बंद आहेत. परंतु ऑनलाईन पद्धतीने याचे धडे अनेक विद्यार्थी आजही गिरवीत असल्याची माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. सध्या तीन टायटलचे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कँडिडेट मास्टर म्हणून पवन डोडेजा, ग्रँड मास्टर म्हणून स्वप्निल धोपाडे आणि इंटरनॅशनल मास्टर म्हणून अनूप देशमुख यांना हे टायटल प्राप्त झाले आहे.
बॉक्स
प्रत्येक शाळांना बुद्धिबळ खेळ अनिवार्य असावे
बुद्धिबळ हा खेळ मुलांची एकाग्रता वाढविण्यास, स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढविण्यास व स्वयं निर्णयक्षमता वाढविण्यास मदतगार ठरतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत खेळाच्या यादीत बुद्धिबळ खेळ अनिवार्य केल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला यातून निश्चित चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.
---
शहरातील सहा शाळांमध्ये बुद्धिबळाचे धडे
शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स, ज्ञानमाता हायस्कूल, विश्वभारती पब्लिक स्कूल, इंडो पब्लिक स्कूल, एडिफाय, टोमोय, नारायणदास लढ्ढा या शाळेत बुद्धिबळाचे धडे गिरविले जातात. या शाळांचे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेत असून उत्कृष्ट प्रदर्शनदेखील करतात, असे ग्रँड मास्टर स्वप्निल धोपाडे यांनी सांगितले.
--
स्पर्धेत यांचा सक्रिय सहभाग
अमरावती चेस असोसिएशनचे अध्यक्ष विजय देशपांडे, प्रतीक घोगरे, शैलेश पोहेकर, निनाद सराफ, अनुराग तिवारी, मकरंद डोके, सतीश मोदानी, वि मोहता, आल्हाद काशिकर हे अमरावतीत होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत हिरीरीने सहभागी होऊन विशिष्ट भूमिका निभावत असल्याची माहिती पवन डोडेजा यांनी दिली.
--
कोरोनाकाळात ऑनलाईन प्रशिक्षण
कोरोनामुळे दोन वर्षांपासून बुद्धिबळाचे प्रत्यक्ष धडे देता येत नसल्याने शहरातील बहुतांश मुला-मुलींना ऑनलाईन धडे देण्यात येत आहे. या काळात सर्वच खेळांवर प्रतिबंध लागले. मात्र, बुद्धिबळ हा खेळ सातत्याने सुरू आहे. तसेच कोरोना संक्रमणाच्या भीतीने शाळा बंद असल्याने व घराबाहेर फिरण्यास मनाईचे आदेश असताना अनेक मुलांनी घरात बसून बुद्धिबळ खेळाचा चांगला सराव केला. त्यात त्यांच्या बुद्धिला चालनाही मिळाल्याचे चिराग बैस याने सांगितले. सध्या चिराग बैस, अभिराम धोटे हे उत्तमरीत्या चेस खेळ असल्याचे सांगण्यात आले.