तिजोरीच्या चाव्या तुषार भारतीयांकडे
By Admin | Published: March 18, 2017 12:02 AM2017-03-18T00:02:35+5:302017-03-18T00:02:35+5:30
अपेक्षेनुरुप तुषार भारतीय यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.
महापालिका स्थायी समिती : काँग्रेसचे तीन सदस्य अनुपस्थित
अमरावती : अपेक्षेनुरुप तुषार भारतीय यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. भारतीय यांच्या दोन नामांकनांव्यतिरिक्त अन्य नामांकन न आल्याने तुषार भारतीय हे स्थायी समिती सभापती म्हणून अविरोध निवडून आल्याची घोषणा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी केली.
१६ सदस्यीय स्थायी समिती सभागृहात भाजपकडे ९ सदस्यांचे संख्याबळ असल्याने भारतीय यांची निवड केवळ औपचारिकता होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही औपचारिकता पूर्ण झाली. त्यानंतर भाजपक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. अविरोध निवड प्रक्रियेवेळी काँग्रेसच्या शोभा शिंदे, मंजुश्री ठाकरे आणि हाफिजाबी हे तीन सदस्य अनुपस्थित होते तर उर्वरित १३ सदस्य स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात उपस्थित होते. स्थायी समितीत भाजपक्षाचे ९, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, शिवसेना आणि बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहे.
९ मार्चलाच तुषार भारतीय स्थायी समिती सभापती असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. ४५ सदस्यीय भारतीय जनता पक्ष स्थायी समितीमध्ये ८ सदस्य पाठवू शकत होता. मात्र, स्थायी सभापतीपदासाठी त्यांना एका सदस्याची गरज होती. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून युवा स्वाभिमानच्या तीन सदस्यांपैकी सपना ठाकूर यांना स्थायी समितीत पाठविण्यात आले. ठाकूर यांच्या रूपाने भाजपच्या गोटातून नववा सदस्य स्थायी समितीत पाठविण्यात आल्याने भारतीय यांच्या सभापतीपदाचा मार्ग प्रशस्त झाला. १७ मार्चला सभापतीची निवड करण्यात यावी, असे विभागीय आयुक्तांनी कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी किारण गीत्ते सकाळी ११ वाजता स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत सभापतीपदासाठी नामांकन प्रक्रिया घेण्यात आली. मात्र, या कालावधीत तुषार भारतीय यांचेच दोन नामांकन आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा त्यांनी केली.
महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले यांच्यासह मिलिंद चिमोटे, भाजप प्रवक्ते किरण पातुरकर, शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत असल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मालमत्ता करावर अधिक विसंबून न राहता उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी या आर्थिक वर्षात नवे स्त्रोत शोधण्यात येतील. अमरावतीकरांना निराश करणार नाही.
-तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती