चेतन पवार राकाँचे नवे गटनेते
By admin | Published: April 20, 2016 12:23 AM2016-04-20T00:23:16+5:302016-04-20T00:23:16+5:30
प्रभाग क्र.२० चे नगरसेवक तथा माजी उपमहापौर चेतन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्रंटचे नवे गटनेते बनले आहेत.
शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांनी दिले पत्र
अमरावती : प्रभाग क्र.२० चे नगरसेवक तथा माजी उपमहापौर चेतन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फ्रंटचे नवे गटनेते बनले आहेत. १८ एप्रिलला विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. ते महापालिकेतील २५ सदस्यीय राकाँ फ्रंटचे नेतृत्व करतील.
मावळते गटनेते अविनाश मार्डीकरांची स्थायी समिती सभापती पदी वर्णी लागल्याने नवा गटनेता कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पवार यांचीच या पदावर नियुक्ती झाली. मार्डीकरांनी स्थायी सभापती म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गाडी, केबीन आणि अधिकाराचे हे पद आपल्या पदरात पडावे, यासाठी काही इच्छुकांनी पक्षप्रमुखांकडे रदबदली चालविली होती. मात्र, २५ नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राकाँ फ्रंटचे नेते संजय खोडके यांनी त्यांच्या विश्वासातील व्यक्तिवर टाकली आहे.
राकाँफ्रंटच्या गटनेतेपदासाठी चेतन दशरथराव पवार यांचे नाव घेण्याबाबत मार्डीकरांनी मागील २ एप्रिलला विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले. ते पत्र विभागीय आयुक्तांकडे १३ एप्रिलला पोहोचले. त्यावर १८ एप्रिलला निर्णय घेण्यात आला. प्रवीण मेश्राम, सारिका महल्ले, निलिमा काळे, विजय बाभुळकर, सपना ठाकूर, आशा निंधाने, चेतन पवार, जयश्री मोरय्या, नंदकिशोर वऱ्हाडे, मिलिंद बांबल, ममता आवारे, अविनाश मार्डीकर, वंदना हरणे, सुनील काळे, चरणजितकौर नंदा, जावेद मजीद मेमन, जयश्री मोरे, भूषण बनसोड, शेख हमीद शेख शद्दा, बिल्किस बानो, रहिमाबी, मो. इमरान, मो.याकूब, अंबादास जावरे, दिनेश बुब, हमीदाबानो शेख अजफल यांचा राकाँ फ्रंटमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)