छत्री तलाव आजही भागवतोय उमरावतीची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:23 AM2019-06-08T01:23:17+5:302019-06-08T01:24:25+5:30
दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
अमरावती शहरालगतच्या छत्री तलावाची निर्मिती सन १८८८ साली झाली. दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावेळी २ लाख ३६ हजार रुपये खर्चून इंग्रजांनी हा तलाव तयार केला होता. पूर्वीच्या उमरावती शहरातील लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी छत्री तलाव सक्षम होता. तलावाचे पाणी शहराला पुरविता यावे, या उद्देशाने १८९०-९१ मध्ये मोठी पाइप लाइन टाकण्यात आली होती. छत्री तलावापासून ती पाइप लाइन राजापेठ व अंबापेठपर्यंत गेल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. त्यावेळी याच पाईप लाईनवर नळ बसविण्यात आले होते. विविध परिसरातून जाणाºया या पाइप लाइनवरील नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आजही या नळातून पाणीपुरवठा केला जात असून, छत्री तलावालगतच्या परिसरातील नागरिक पाण्याचा उपयोग करीत आहेत. याशिवाय या तलावाची पाण्यामुळे जेवडनगर, फर्शी स्टॉप, कलोतीनगर, दस्तुरनगर, बेनोडा आदी परिसरातील जलपातळी राखण्यास मोठी मदत मिळाली आहे. भविष्यात जलसंकट गडद झाल्यास या तलावाचा उपयोग होणार आहे.
शुद्धीकरण केंद्र सुरू करावे
छत्री तलावातील पाण्याचा वापर आजही होत आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणी मिळत आहे. आगामी संकटकाळात छत्री तलाव उपयोगी पडेल. तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून पाइप लाइन व सयंत्राचे नूतनीकरण केल्यास शहरातील काही परिसरात पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती स्थानिक रहिवासी नीलेश कंचनपुरे यांनी दिली.
पाण्याची पातळी वाढविण्यास मदत
छत्री तलावातील पाणी पंचवीस हजार लोकसंख्येला पुरेल, या अंदाजाने तो बनविण्यात आला. दररोज पाच लाख गॅलन पाणी शहरास देता देईल, असा अंदाज होता. तलाव पूर्ण भरल्यास, त्यात सव्वा तीन लाख गॅलन इतक्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो; दीड वर्ष पाणी पुरेल, असा अंदाज होता. याशिवाय तलाव भरण्यासाठी एकावेळी सतत चोवीस तास सात ते नऊ इंचापर्यंत पाऊस पडणे अपेक्षित होते. तरीदेखील त्यावेळी या तलावाने नागरिकांना बराच दिलासा दिला. आजही छत्री तलावातील पाण्याने आजूबाजूच्या परिसरातील पातळी राखून ठेवली आहे.
छत्री तलावाचा इतिहास
सन १८८८ साली उमरावती नावाने ओळखल्या जाणाºया अमरावती शहरास पूर्वी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कालांतराने ब्रिटिशांनी तलाव तयार केल्यानंतर त्या पाण्याचा वापर सुरू झाला. पूर्वी कालापानी तलाव नावाने ओळखल्या जाणाºया या तलावावर छत्री बांधण्यात आली. तेव्हापासून छत्री तलाव नावारूपास आले. शहराच्या पूर्वकडील टेकड्यांचा आश्रय घेऊन व तेथून वाहणाºया नाल्याचे पाण्याचा प्रवाह तलावाच्या पोटात राहील, अशा रीतीने हा तलाव बांधण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी मातीचा भराव टाकून पाळ बांधण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी मोठा पाइप पाळेच्या खालून बाहेर काढलेला आहे. तेथेच छत्री बांधण्यात आली. या छत्रीखालीच पाणी सोडण्याच्या चाव्या आहेत. तलावाच्या तळापासून १५ फुट उंचावर पाइप आहे. पंधरा फुटांपेक्षा अधिक पाणी तलावात असेल, तर शहराला पाणीपुरवठा होत होता.