कमरेला पिस्टल दिवाळी पाडव्याच्या दिवशी दादागिरी; एलसीबीने आरोपीला केले जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: November 2, 2024 01:23 PM2024-11-02T13:23:29+5:302024-11-02T13:23:29+5:30
दिवाळीच्या दिवशी परतवाडा शहरातील कारवाई.
प्रदीप भाकरे, अमरावती: दिवाळीच्या दिवशी कमरेला देशी बनावटीचे पिस्टल खोचून फिरणाऱ्या एका आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. चिची उर्फ शेख सादिक शेख सलीम (२०, रा.खिरणी बगीचा, परतवाडा) असे अटक पिस्टलबाजाचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस असा एकुण २१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुध्द परतवाडा पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद करण्यात आला. चिचीविरूध्द जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे.
विधानसभा निवडणूक व सणउत्सवाच्या अनुषंगाने जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस स्टेशन यांना विनापरवाना अवैधरित्या शस्त्रे बाळगणा-या इसमांवर विशेष लक्ष ठेवुन त्यांचेकडे असणारे अवैध शस्त्रे जप्त करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने टिम एलसीबी ३१ ऑक्टोबर रोजी परतवाडा हददीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चिचीबाबत माहिती मिळाली. तो परतवाडा येथील तिरुपती नगर भागात संशयितरित्या वावरतांना दिसला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे दिसून आली. त्याच्याकडे परवाना आढळून न आल्याने त्याच्याविरूध्द परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार अंमलदार युवराज मानमाठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक हर्षद घुसे यांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात सर्वत्र एलसीबीचे पथक लक्ष ठेऊन आहे.