पकड... पकड... पयाली... पयाली... कोंबड्याच कोंबड्या! किती न्याल घरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 12:26 PM2022-11-03T12:26:03+5:302022-11-03T12:34:04+5:30
ट्रकमधील कोंबड्या सोडल्या पुलाखाली; नागरिकांची एकच झुंबड
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील शेंबी नाल्याच्या पुलाखाली कोंबड्यांचा एकच गलका ऐकू आला आणि ग्रामस्थांच्या नजरा त्याकडे वळल्या. शेकड्याने कोंबड्या असल्याने किती न्यायच्या अन् किती नाही, याचा संभ्रम पडलेला. त्यामुळे मित्रांनाही फोन करून बोलावण्यात आले. आता तेथे कोंबड्यांपेक्षा माणसांचा आवाज जास्त झाला होता.
अंजनगाव ते परतवाडा महामार्गावर पांढरी खानमपूरनजीक शेम्बी नाल्याच्या पुलाखाली बुधवारी सकाळी शेकडो जिवंत कोंबड्या झाडाझुडपात फिरताना आढळून आल्या. काही नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या होत्या. हा रस्ता वाहतुकीचा असल्याने ही घटना पाहण्यासाठी गर्दी उसळली. त्यातच कोंबड्या पकडण्यासाठी गावकरी व बघ्यांनीदेखील नशीब आजमावले.
पकड..... पकड.... पयाली...पयाली.... पकडली असा एकच गोंधळ घटनास्थळी उडाला होता. त्यापूर्वी नागपूर येथून कोंबड्या घेऊन निघालेला ट्रक रस्त्याने जाताना चालक व मदतनीस यांच्यात जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात चालकाने अख्खा ट्रकच नाल्यात रिकामा केला असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये होती. लम्पी रोगाच्या भीतीनेसुद्धा कोंबड्या बेवारस सोडल्याची चर्चा होती. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, पण प्रशासन मात्र घटनेपासून अलिप्त होते.