मुख्य निवडणूक अधिका-यांनी घेतला निवडणूक कामाजाचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:34 PM2018-12-20T19:34:36+5:302018-12-20T19:35:38+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील पाचही जिल्ह्यांतील निवडणूक पूर्वतयारीचा तपशीलवार आढावा घेतला.
अमरावती - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदार नोंदणी आणि मतदार याद्यांच्या प्रकाशनाची पूर्वतयारी, मतदानयंत्र आणि यावेळी प्रथमच उपयोगात आणली जाणारी व्हीव्हीपॅट यंत्राबाबतची जनजागृती मोहीम आणि निवडणूक पूर्वतयारीचा तपशीलवार आढावा घेतला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दिवसभर दोन सत्रात चाललेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आणि उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर उपस्थित होते. विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गजेंद्र बावणे, रमेश मावस्कर बैठकीला उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचे व्यापक पुनर्निरीक्षण करण्यात आले असून, या याद्या आगामी महिन्यात प्रकाशित होणार आहेत. या याद्या निर्दोष असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या कामाचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. मतदारयादीतील मतदारांची नावे आणि छायाचित्रे, मतदारांकडील ओळखपत्रावरील माहिती व छायाचित्र यात कोणतीही विसंगती असू नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिका-यांनी त्यांच्या स्तरावर वेळोवेळी आढावा घ्यावा, तसेच मतदार नोंदणी अधिकाºयांनी संबंधित प्रभागाच्या अधिकाºयांकडून होणारी कामे अचूक असतील याची दक्षता घ्यावी. मतदारयादीत प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि या प्रयत्नात गावपातळीवरील यंत्रणेचा सहभाग असावा, अशा सूचना देण्यात आल्या.
येत्या निवडणुकीत मतदानयंत्रासोबत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा उपयोग होणार आहे. या यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हतेबाबत विभागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकाºयांनी या अभियानाचा दैनंदिन आढावा घ्यावा, त्याची प्रात्यक्षिके सर्वत्र दाखवली जात आहेत. प्रात्यक्षिकांच्यावेळी नागरिकांच्या शंकांची उत्तरे दिली जात आहेत, याची दक्षता घ्यावी, असेही अश्वनी कुमार म्हणाले. गावपातळीवरील प्रात्यक्षिकांची पुरेशी पूर्वप्रसिद्धी करावी. या यंत्रात बाह्यहस्तक्षेप अशक्य आहे, ही बाब नागरिकांना स्पष्टपणे समजावून सांगितली जावी, असे ते म्हणाले. दिव्यांग मतदारांसह सर्व मतदारांच्या दृष्टीने मतदानकेंद्रे सोयीची असल्याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यंत्रणेतील अधिकाºयांना निवडणुकांचा अनुभव आहे. मात्र केवळ त्या बळावर पुढे जाता येणार नाही. बदलते तंत्रज्ञान, समाजमाध्यमांचा उपयोग आदी बाबी आत्मसात कराव्या लागतील. त्यादृष्टीने सर्व अधिकाºयांनी नेहमी अद्ययावत माहिती जाणून घेतली पाहिजे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाचे कौशल्य त्यांनी वेळोवेळी अद्ययावत करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.