मुख्यमंत्र्यांनी मागविली फाईल
By Admin | Published: November 22, 2015 12:07 AM2015-11-22T00:07:40+5:302015-11-22T00:07:40+5:30
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली ....
खापर्डे वाडा : मनपा आयुक्तांना आदेश
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली असून तसे पत्र नगर विकास मंत्रालयाचे आयुक्तांना प्राप्त झाले आहे.
महानगर पालिकेने ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी वाड्याची जमीन संपादित करण्यासंदर्भात आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मंत्रालयाच्यावतीने पत्र पाठवून आदेशित करण्यात आले आहे. खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे पाठवावे, असे त्यात पत्रात नमूद आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळी याच खापर्डे वाड्यातून लढल्या गेल्याचा इतिहास आहे. तसेच अनेक संतानी येथे भेटी दिल्या आहे. पुणे येथील शनिवार वाड्याप्रमाणेच खापर्डे वाडा हा अंबानगरीचे वैभव आहे. तसेच येथे शेगावीचा योगी श्री संत गजानन महाराजांनी भेट दिली होती. हा सगळा इतिहास पाहता आ. रवि राणा यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ऐतिहासिक वाड्याचे जतन करण्यासाठी मनपाने ही जागा संपादित करावी या संदर्भाचे ९ नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. त्यामुळे खुद मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून आयुक्तांना या प्रकरणाची फाईल त्वरित पाठविण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा सर्वप्रथम ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. खापर्डे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लोकदरबारात मांडले होते. त्यामुळे हे मोठे यश मानल्या जात आहे. (प्रतिनिधी)