श्रीनिवास रेड्डींवर कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:21+5:302021-05-01T04:12:21+5:30
यशोमती ठाकूर यांची माहिती, मेळघाटात दोन दिवस दौरा, महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद, भेटी घेतल्या अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ...
यशोमती ठाकूर यांची माहिती, मेळघाटात दोन दिवस दौरा, महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद, भेटी घेतल्या
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्याचवेळी केली होती. विशेष म्हणजे, याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले तसेच मेळघाट येथे भेट देऊन महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्याच्या परिणामी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी हे दाेषी आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. ही अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली. या घटनेच्या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून तेथे कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले. दीपाली चव्हाण यांच्या मोरगाव येथील निवासस्थानी भेट देताना, याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार शासनपातळीवर सर्वच स्तरांवरून पाठपुरावा करण्यात आला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहती देताना, दीपाली चव्हाण यांना न्याय देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीसुद्धा केल्याचे ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या. कणखर व कर्मठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक हा या पाठपुराव्याचा परिपाक आहे. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी, असे निर्देश सरवदे यांना दिले होते. जलदगतीने निष्पक्ष चौकशीची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.
-------------
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही रेड्डींनी गांभीर्याने घेतले नाही
दीपाली यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्याकडून काही निवेदने आपल्याकडे आली हाेती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राद्वारे या तक्रारींची दखल घेऊन त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रेड्डी यांना पत्र दिले होते. परंतु, या पत्राला रेड्डींनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आत्महत्याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी सुरुवातीपासूनच केली होती. त्यानुसार अगोदर विनोद शिवकुमार व आता श्रीनिवास रेड्डी यांना अटक झाली आहे. राज्य सरकारने कुणालाही वाचविण्याच्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही, हे घटनाक्रमावरून दिसून येत असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.