‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज मिशन मोडवर!

By प्रदीप भाकरे | Published: July 12, 2024 01:07 PM2024-07-12T13:07:23+5:302024-07-12T13:07:57+5:30

महानगरपालिका आयुक्त : झोन निहाय अधिका-यांना आदेश

'Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana' application on mission mode! | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज मिशन मोडवर!

'Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana' application on mission mode!

प्रदीप भाकरे 
अमरावती :
राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची अमरावती शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी झोननिहाय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे २८ जूनपासून लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत मिळणार आहे. योजनेची अमरावती शहरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, लाभार्थी महिलांची फरपट होऊ नये, यासाठी मनपा झोननिहाय अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी शहरातील बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सर्व लाभार्थी महिलांचे बँक खाते उघडले जातील याची सुनिश्चिती करणे, महानगरपालिका कार्यालयातील जन्म दाखल्यांच्या विभागातून लाभार्थ्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तत्काळ पुरविण्यासाठी नियोजन करणे, आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज स्वीकृती करणे, तपासणी करणे, पोर्टलवर अपलोड करण्याचे नियोजन करणे, शहरात योजनेची दवंडी देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रसार करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नियोजनबद्ध होईल. लाभार्थ्यांना योजनेचा सुलभ लाभ मिळेल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. योजनेच्या अनुषंगाने अडचणी आल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका झोनस्तरावर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी महिला, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे अध्यक्ष या योजनेचे अर्ज भरून देऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करणे किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनातर्फे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी पैसे देऊ नयेत. या योजनेचे अर्ज स्विकारण्याकरीता अमरावती महानगरपालिकेत झोनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.
सचिन कलंत्रे, महापालिका आयुक्त

Web Title: 'Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana' application on mission mode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.