मुख्यमंत्री घेणार १० योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:43 PM2018-10-13T22:43:06+5:302018-10-13T22:43:26+5:30
राज्य शासनाच्या १० महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात लगबग वाढली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांतील संबंधित अधिकाºयांना याबाबतची कारणमीमांसा थेट मुख्यमंत्र्यांसमक्ष करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या १० महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात लगबग वाढली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांतील संबंधित अधिकाºयांना याबाबतची कारणमीमांसा थेट मुख्यमंत्र्यांसमक्ष करावी लागणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांशी निगडित राज्य शासनाच्या १० महत्त्वाच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आहेत. या अनुषंगाने पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक समिती गठित करण्यात आली. या योजनांची फलनिष्पत्ती होण्यासाठी या समितीद्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री रविवारी नियोजन भवनात १९ विभागप्रमुखांची बैठक घेणार आहे. मात्र, बैठकीची वेळ निश्चिती उशिरापर्यंत झाली नव्हती. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा मुख्यमंत्री घेतील. यात शासन उद्दिष्ट व पूर्ण झालेली घरांची संख्या, प्रधानमंत्री शहरी आवास योजना, नगरोत्थान व अमृत योजना, जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक सिंचन विहीर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना व मुद्रा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दलितवस्ती सुधार योजना व ठक्करबाप्पा योजना आदींचा आढावा, जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्रातील दोन वैशिष्ट्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प, बळीराजा योजना तसेच पंतप्रधान कृषिसिंचन योजनेचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत.
कायदा, सुव्यवस्थेसह महापालिकेचाही आढावा
मुख्यमंत्री रविवारी सकाळी १० वाजता शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांसंदर्भात नियोजन भवनात जिल्ह्याची आढावा बैठक घेतील. दुपारी १२ वाजता महापालिका आढावा बैठक, दुपारी १ वाजता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक घेऊन २.३० वाजता बेलोरा विमानतळाकडे प्रस्थान करणार आहेत.