'लाडका शेतकरी दादा' योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राबवावी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:48 AM2024-07-29T11:48:29+5:302024-07-29T12:03:02+5:30
Amravati : शेतमालाला भाव, विम्याचे सरसकट कवच, मोसंबी संत्रा फळांना राजाश्रयाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : सध्या राज्यात 'माझी लाडकी बहीण'पाठोपाठ भावाची योजना सुरू झाली आहे. अशा लाडक्यांकडून योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आश्वस्त करण्यासाठी शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेत लाभार्थ्यांना महिन्याला दीड हजार मिळणार आहे. मात्र, जगाचा - पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी जर शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना आणून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार हमीभाव मिळावा, ही रास्त अपेक्षा या योजनेंतर्गत हवी, अशी मागणी आहे.
शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर आहे. हा अशाश्वत व्यवसाय शेतकऱ्यांचे जीवन डावावर लावतो. अनेक शेतकरी नापिकीमुळे कर्ज भरण्यास असमर्थ राहतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. 'विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा मोसंबी फळबागांची अवस्था केविलवाणी आहे. येथल्या संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा, ही मागणी आहे. 'माझा लाडका शेतकरी दादा' या योजनेत फळपिकांना विम्याचे कवच, योग्य भाव तसेच फळांवर आधारित वायनरी प्रकल्प येथे उभे केले की, संत्रा मोसंबी फळांच्या सर्व प्रतवारीच्या फळांना योग्य भाव मिळेल, हीच रास्त अपेक्षा व मागणी असल्याचे असंख्य संत्रा मोसंबी उत्पादकांनी 'लोकमत'शी बोलताना भावना व्यक्त केल्या.
"गतवर्षी अतिवृष्टी व नंतर गारपिटीने फळबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळाली नाही. शासनाने आता माझा लाडका शेतकरी दादा ही योजना आणली पाहिजे. शासनाने शेतकऱ्यांकडे सकारात्मक बघायला हवे. तरच हा जगाचा पोशिंदा जगेल."
- गिरीश कराळे, संत्रा उत्पादक, वरुड
"शासनाने माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ ही योजना आणली आहे. आता शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी दादा ही योजना शासनाने राबवावी. फळबागांना विमा कवच, खासगी व्यापाऱ्यांवर अंकुश, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने ही योजना राबवावी."
- धनंजय विंचूरकर, संत्रा-मोसंबी उत्पादक
"संत्रा उत्पादक शेतकरी जगला पाहिजे असेल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी."
- राजेंद्र ताथोडे, संत्रा उत्पादक, शेतकरी बेलोरा (ताथोडे]