मुख्यमंत्र्यांनी केले आदिवासींना बोलके
By admin | Published: November 29, 2014 11:10 PM2014-11-29T23:10:52+5:302014-11-29T23:10:52+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना
महिलांनी मांडल्या समस्या : पाच तासांत पाच गावांचा दौरा
श्यामकांत पाण्डेय/राजेश मालवीय - धारणी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील अतिदुर्गम मालूर, चौराकुंड, वनमालूर, हरिसाल या गावांना भेटी देऊन आदिवासींसोबत थेट संपर्क साधला. न घाबरता समस्या मांडण्याची सूचना त्यांनी आदिवासींना केली. आदिवासी महिलांनीही आपल्या परिसरातील समस्यांचा पाढा अगदी दिलखुलासपणे मुख्यमंत्र्यांसमोर वाचला.
तालुक्यातील वनमालूर येथे सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री पोहोचले. त्यांना पारंपरिक आदिवासी नृत्यासह गावात आणण्यात आले. कार्यक्रमस्थळी स्वत: बोलण्याचे टाळून त्यांनी आदिवासींना बोलण्याची संधी दिली.
वन संरक्षण समितीचे अध्यक्ष ब्रिजलाल मावस्कर यांनी वन विभागाचे कौतुक करीत दहा लाखांचे अनुदानातून लक्ष्मी चूलच्या माध्यमातून १५०० किलो लाकडाची बचत होत असल्याची माहिती दिली. सोलर लँप व गॅस सिलिंडरचे महत्त्व सांगितले. ५ दुधारू गाई, ११ कुक्कुटपालन, शिलाई मशीन्स दिले व समितीच्या माध्यमातून ८०० हेक्टर जमिनीवरील वनसंपत्ती वाचविल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे कमलाबाई हेकडे यांनी वनाधिकारी जंगलात जनावरांना चराईसाठी मनाई करीत असल्याने आमचे लवकर पुनर्वसन करा, अशी मागणी केली. समायबाई हिराजी चिमोटे यांनी गावात वीज येत नाही, पाणी मिळत नाही, बाजारगाडीही येत नाही, आम्हाला या समस्येतून बाहेर काढा, अशी गाऱ्हाणी मांडली. यावेळी जाब विचारण्यासाठी उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सोलर लॅम्पचे वाटप केले.