मुख्यमंत्र्यांचे आगमन अन् वाळू माफियांचा दिवाळसण !
By admin | Published: November 22, 2014 10:51 PM2014-11-22T22:51:21+5:302014-11-22T22:51:21+5:30
विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे.
महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
श्यामकांत पाण्डेय - धारणी
विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे. परिणामी येथील रेती तस्करांचे फावले असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौण खनिजांच्या चोरीला ऊत आला आहे. मुख्यमंत्र्यांचे आगमन अन् वाळू माफियांचा दिवाळसण अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मेळघाटलाही भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीत सध्या सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासनाची नुसती लगबग चालली आहे. या व्यस्त कार्यक्रमांमध्ये येथील रेती तस्करांकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा पुरेपूर फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. गौण खनिज तस्कर सक्रिय झाले असून मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला ऊत आला आहे.
सध्या रेती तस्करीचा सर्वाधिक फटका गडगा नदीला बसत आहे. या नदीपात्रातून दररोज रात्री व पहाटेच्या वेली रेतीचा उपसा सुरू आहे. नदीच्या पात्रातून रेती काढून ट्रॅक्टरमध्ये भरली जाते. नंतर ट्रॅक्टर मालकांच्या देखरेखीत ही रेती गंतव्यापर्यंत पोहोचविली जाते. मार्गातील धोक्याची चाहूल लागताच भ्रमणध्वनीद्वारे याची सूचना मालकाकडून ट्रॅक्टर चालकाला मिळते. अशा स्थितीत उचलावयाच्या पावलांची पूर्व कल्पना असल्याने चालक रेती त्याच ठिकाणी रिती करून पळ काढतात. नंतर तीच रेती पुन्हा काही वेळाने उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. या कामात सहभागी असणाऱ्यांची टोपण नावेही मोठी रोचक आहेत.