VIDEO- मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड, जल्लोषामध्ये नोटा उधळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 08:31 PM2018-03-09T20:31:04+5:302018-03-09T20:41:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोटी यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला.
अमरावती- मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोटी यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शुक्रवारी कलोटी बिनविरोध निवडून आलेत. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या दालनाजवळून त्यांची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीदरम्यान पैसै उडविण्याचा हा प्रकार घडला. या प्रकारामुळे भाजपाचा हाच का पारदर्शक व गतिमान कारभार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाला कोण हटकणार, अशी प्रतिक्रियासुद्धा उमटली. कलोटींच्या या विजयोत्सवाला या प्रकाराने भलतेच वळण मिळाले. या मिरवणुकीत महापौरांसह सभागृहनेता व भाजपच्या शहर अध्यक्षांसह बडे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले होते.
फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीतून बाहेर पडल्यानंतर कलोटी यांचा पुनर्प्रवेश झाल्याने तेच स्थायी समितीचे सभापती बनतील, अशी शक्यता होती. शुक्रवारी अपेक्षेनुरूप त्यांच्याविरुद्ध अन्य सदस्यांचे नामांकन न आल्याने त्यांची अविरोध निवड झाली. शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास विवेक कलोती सभागृहाबाहेर पडले. भाजयुमोचे शहर अध्यक्ष असलेले कलोती सभापती बनल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर खांद्यावर उचलून घेतले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरून ओवाळून २० रुपयांच्या अनेक नोटा उधळल्या. त्यानंतर राजकमल चौकातही १० च्या नोटांचे बंडल उधळण्यात आले.
विवेक कलोटी यांच्या मिरवणुकीदरम्यान उधळल्या गेलेल्या नोटा बनावट, खेळण्यातील होत्या. मीच तो प्रकार बंद करण्यास बजावले. आमच्याकडे उधळायला पैसे नाहीत.
- जयंत डेहनकर, शहराध्यक्ष, भाजप
एकीकडे महाराष्ट्रात कास्तकार मरताहेत. बेरोजगारी वाढली आहे. अशा विपरीत परिस्थितीत विजयी मिरवणुकीदरम्यान पैसे उडविणे ही शेतकरी-कष्टकºयांची थट्टा आहे. भाजपच्या स्थायी समिती सभापतींना हे शोभणारे नाही. काँग्रेसतर्फे आम्ही या कृत्याचा निषेध करतो.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता, महापालिका