कॉफी उत्पादित करणारे चिखलदरा एकमेव हिल स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:24+5:302021-08-02T04:05:24+5:30
चहाच्या मळ्याचीही नोंद, इंग्रज अदमानीत झाले विकसित अनिल कडू परतवाडा : कॉफी उत्पादित करणारे चिखलदरा हे राज्यातील एकमेव हिल ...
चहाच्या मळ्याचीही नोंद, इंग्रज अदमानीत झाले विकसित
अनिल कडू
परतवाडा : कॉफी उत्पादित करणारे चिखलदरा हे राज्यातील एकमेव हिल स्टेशन ठरले आहे. इंग्रजांनी चिखलदरा येथे चहाचे मळे विकसित करून चहाचे उत्पादनही घेतले आहे.
इंग्रज अधिकारी ए. ई. नेल्सन व बॅचलर अर्नेस्ट यांच्या नोंदीनुसार, चिखलदऱ्यात त्याकाळी चहा आणि कॉफीचे मोठ्या प्रमाणात खासगी मळे होते. चहा व कॉफीच्या लागवडीकरिता असलेला वाव बघून अनेक युरोपियन बागायतदारांना चिखलदऱ्याकडे आकर्षित केले होते. त्या बागायतदारांनी चहा व कॉफीचे मळे या ठिकाणी फुलविले. कालांतराने हे चहाचे मळे संपुष्टात आले. मात्र रोमन कॅथोलिक मिशनरीकडील जमिनीवर कॉफीचे खासगी मळे टिकून आहेत.
इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम्यान रोमन कॅथोलिक मिशनची सुरुवात करणाऱ्या फादर थेवनेट यांनी रोजगार व उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कॉफीचा विचार केला आणि १९१०पर्यंत चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणात कॉफीचे मळे विकसित केले. मरियमपूर परिसरात जवळपास १०० एकरात कॉफी लागवड केली गेली.
इंग्रजांच्या नोंदीनुसार, चिखलदऱ्यात ९७.२०० हेक्टर म्हणजेच २४० एकरात कॉफीची लागवड होती. आज मात्र केवळ १७ हेक्टर क्षेत्रावरच कॉफी लागवड आहे. चिखलदरा गार्डन, वनविभागाचे बंगले आणि विश्राम गृह परिसरासह मरियमपूर भागात कॉफी वृक्ष बघायला मिळतात. चिखलदऱ्यातील कॉफी त्याकाळी ट्रकद्वारे मद्रास येथील पोलसन कंपनीकडे पाठविली जायची. १९६५ पर्यंत कॉफीचे ट्रक चिखलदऱ्यातून रवाना केले जात होते.
---------------
अरेबिका कॉफीची लागवड सोयीची
कर्नाटक कॉफी बोर्डाचे संशोधन उपसंचालक ए.जी. सांबामूर्ती रेड्डी आणि केरळ कॉफी बोर्डाचे संशोधन उपसंचालक डॉ. टी राजू यांनी २४ व २५ डिसेंबर १९९६ ला चिखलदरा येथे येऊन चिखलदरा कॉफीचा अभ्यास केला. चिखलदरा येथे अरेबिका कॉफीची लागवड सोयीची असल्याचा त्यांचा अभिप्राय आहे.
------------
अप्पर प्लॅटोवर १०० हेक्टर क्षेत्र आरक्षित
समुद्रसपाटीपासून ३६६४ फूट उंचीवर असलेले चिखलदरा हे अप्पर प्लॅटो आणि लोअर प्लॅटो अशा दोन भागात विभागले आहे. या दोन प्लॅटो मधील उंचीतील अंतर 80 फूट आहे. चिखलदरा येथील कॉफीचे वृक्ष अप्पर प्लॅटोवर बघायला मिळतात. कॉफीकरिता अप्पर प्लॅटोवरचे नैसर्गिक वातावरण पोषक ठरले आहे. सिडकोने सादर केलेल्या आणि अंशतः मंजूर असलेल्या चिखलदरा विकास आराखड्यातसुद्धा कॉफी करिता अप्पर प्लॅटोवर १०० हेक्टर क्षेत्र आरक्षित ठेवले आहे.
--------