विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चवच न्यारी, देशभरातील पर्यटक घेतात आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 12:59 PM2022-01-16T12:59:56+5:302022-01-16T13:10:22+5:30
चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्ट्रॉबेरीची चव आता परतवाडा अमरावती, नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. येथे पर्यटनासाठी येणारे देशभरातील विविध राज्यातील पर्यटक चव चाखतात.
अमरावती : एकेकाळी महाबळेश्वरची प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी आता चिखलदऱ्याची अशी ओळख झाली आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या देशभरातील पर्यटकांंना ती भावते. त्यामुळे जिथे पिकते, तिथेच ती खपतेदेखील. जादा उत्पादन झाल्यास चिखलदऱ्याहून निघालेल्या चवदार स्ट्रॉबेरीचा परतवाडा अमरावती ते नागपूर असा प्रवास होतो. त्यातून चांगला नफासुद्धा शेतकऱ्यांना मिळत आहे.
मागील आठ वर्षांपासून चिखलदरानजीक मोथा, आलाडोह, आमझरी, शहापूर, मसोंडी, खटकाली, सलोना गावातील जवळपास ५० शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत होते. परंतु, आता केवळ बोटावर मोजके चार ते पाच शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. मोथा येथील साधुराम पाटील, गजानन पाटील, गजानन शनवारे, तर आलाडोह येथील मारुती खडके, नारायण खडके आदींचा त्यात समावेश आहे.
झिगझॅग पद्धतीने लागवड
महाबळेश्वर येथील वाई येथून १२ रुपये प्रतिनगप्रमाणे स्ट्रॉबेरीची रोपे आणली जातात. एक फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोवणी केली जाते. एकरात २२ हजारांच्या जवळपास रोपे लागतात. ड्रीप पद्धतीने पाणी दिले जाते. मातीत शेणखत मिसळवले जाते. रोग आला तरच कीटकनाशकची फवारणी केली जाते. कमी पाणी, थंड वातावरणात स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पन्न येते.
जानेवारी ते मार्च उत्पन्न
स्ट्रॉबेरी लागवडीचा एकरी खर्च तीन लक्ष रुपयांच्या जवळपास येतो. लागवड झाल्यावर ४५ दिवसानंतर उत्पन्नाला सुरुवात होते. जानेवारी ते मार्च असे तीन महिने उत्पादन घेतले जाते. आठ ते दहा मजुरांना त्यातून रोजगार मिळतो. दररोज ३० ते ४० किलोपर्यंत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मिळते.
तीन लक्ष रुपये एकरी नफा
तीन लक्ष रुपये एकरी खर्च असला तरी वातावरण योग्य असले तर तेवढाच नफा प्रतिएकरी मिळत असल्याचे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी साधुराम पाटील यांनी सांगितले. ते मागील आठ वर्षांपासून सतत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न दोन एकरात घेत आहेत. यंदा त्यांनी एक एकरात उत्पन्न घेतले.
चिखलदरा ते नागपूर प्रवास
चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्ट्रॉबेरीची चव आता परतवाडा अमरावती, नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. येथे पर्यटनासाठी येणारे देशभरातील विविध राज्यातील पर्यटक चव चाखतात. सोबत परिवारासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात घेऊन जातात.
चवदार स्ट्रॉबेरी ६० ते ७० रुपये पाव
शरीरासाठी पाचक असलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये सी व के ही जीवनसत्त्वे आढळून येतात. ६० ते ७० रुपये प्रति २५० ग्रॅम आणि २८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते. पर्यटक मोठ्या आवडीने ती चिखलदरा शहरातील विविध पानटपरी आणि स्ट्रॉबेरीचा स्टॉलवरून विकत घेतात.
मागील आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहे. वातावरण योग्य असले की, मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. लागवड झाली की, ४५ दिवसानंतर तीन महिन्यापर्यंत उत्पन्न घेता येते. वेगळी चव असल्याने पर्यटक आवडीने विकत घेतात. परतवाडा ते नागपूरपर्यंत जास्त उत्पादन झाल्यास पाठवितो.
साधुराम पाटील, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, मोथा
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोथा ता चिखलदरा