चिखलदरा तालुक्यात वादळी वाऱ्याने ९५ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:22+5:302021-05-29T04:11:22+5:30
चिखलदरा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात गुरुवारी दुपारी ४ वाजता अचानक अवकाळी पावसासह आलेल्या वादळवाऱ्यात चार गावांतील ९५ ...
चिखलदरा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात गुरुवारी दुपारी ४ वाजता अचानक अवकाळी पावसासह आलेल्या वादळवाऱ्यात चार गावांतील ९५ घरांचे छत उडून अंशत: नुकसान झाले. वीज पडून एक गाय दगावली. महसूल प्रशासनाने शुक्रवारी पहाटेपासूनच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. जारिदा येथे झाड व विद्युत खांब उन्मळून पडल्याने परिसरातील २० पेक्षा अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळवाऱ्यात मेहरीआम ५२, जारिदा ३३, सेमाडोह ९, तर आडनदी येथे एका घराचे नुकसान झाले. काही घराचे छत उडाले. अचानक आलेल्या या वादळ वाऱ्याच्या तांडवाने परिसरात दहशत पसरली होती. महसूल प्रशासनाने शुक्रवारी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळी येथे नाना मोरे यांची गाय चरत असताना वीज पडून ठार झाली. मेहऱ्या येथील बद्दू झोलांग पाटनकर, छोटेलाल लालजी धिकार, बालिकराम भोजू चिमोटे, रंगलाल मंदकू बारसकर इतरही आदिवासींच्या घरांची पडझड झाली.
बॉक्स
मिळेल तेथे लपले
सोसाट्याचा वारा, छतावरील टीन उडण्याचा आवाज, कोसळणारा पाऊस पाहता आदिवासी दहशतीखाली आले होते. घरातच पलंगाखाली, तर कोणी सुरक्षित ठिकाणी लपून बसले. सर्व शांत झाल्यानंतर घराबाहेर येताच वादळ वाऱ्याचा तांडव दिसला. दरम्यान नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या पूजा येवले यांनी सांगितले.
कोट
गुरुवारी आलेल्या अवकाळी वादळवाऱ्यात अंदाजे ९५ घरांचे अंशत: नुकसान झाले. तलाठ्यांमार्फत पंचनामा केला जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष किती घरांचे किती नुकसान झाले, हे स्पष्ट होईल.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा
===Photopath===
280521\img-20210528-wa0088.jpg
===Caption===
चिखलदरा वादळ वाऱ्याने 47 घरांची पडझड