चिखलदरा पर्यटन टाकतेय कात, वर्षाला लाखावर पर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:04+5:302021-09-27T04:14:04+5:30
जागतिक पर्यावरण दिन विशेष नरेंद्र जावरे चिखलदरा : अनेक वर्षांपासून खितपत पडलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळ पर्यटकांच्या वाढत्या संख्येने ...
जागतिक पर्यावरण दिन विशेष
नरेंद्र जावरे
चिखलदरा : अनेक वर्षांपासून खितपत पडलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळ पर्यटकांच्या वाढत्या संख्येने आता देशभरात आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अशातच विकासकामांची सुरुवात झाल्याने पर्यटनस्थळ कात टाकत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशातील महत्त्वपूर्ण मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागूनच असल्याने वाघांची वाढती संख्या आणि कालपर्यंत देवदुर्लभ असणारे दर्शन आता सहज होत आहे. स्काय वॉकमुळे हे पर्यटनस्थळ जगाच्या नकाशावर आले आहे.
इंग्रज कॅप्टन रॉबिन्सन यांनी चिखलदरा पर्यटनस्थळाचा शोध लावला. समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर हे पर्यटनस्थळ आहे. देशातील १० प्रमुख स्थळांमध्ये याचा समावेश होतो. चंद्रभागा नदीचे उगमस्थान, जंगल सफारी, आदिवासीची कुळदेवता देवी पॉइंट येथील जनादेवीचे मंदिर, इतिहासाची साक्ष देणारा गाविलगड किल्ला, महाभारतकालीन किचकवधाचा संदर्भ असलेली किचक दरी, भीमाने रक्ताने माखलेले हात ज्या डोहात धुतले तो भीमकुंड, विराट राजाची नगरी असलेले वैराट आणि सेमाडोह येथील जंगल सफारी, एका आवाजाला पाच वेळा प्रतिसाद देणारा पंचबोल पॉईंट, ढगांशी स्पर्धा करणारा हरिकेन पॉईंट, वनउद्यान आणि उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, जत्राडोह, चिचाटी, कलालकुंड, बकादरी, जवाहरकुंड असे महत्त्वपूर्ण धबधबे पावसाळ्यात धो-धो कोसळत आहेत. दुसरीकडे सिपना, चंद्रभागा, खंडू, खापरा, खुर्शी, डोलार या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बॉक्स
स्काय वॉक ठरणार मुख्य केंद्र
चिखलदरा पर्यटनस्थळावर स्काय वॉकचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सिडकोमार्फत या कामाची सुरुवातही झाली आहे. काही प्रशासकीय कामे अडकली असली तरी लवकरच दोन वर्षांच्या आत ती होण्याची चिन्हे आहेत. हे स्काय वॉक देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे असल्यामुळे लाखो पर्यटकांची पावले चिखलदरा पर्यटनस्थळाकडे वळतील. या प्रकल्पाच्या कामामुळे चिखलदरा पर्यटनस्थळ जगाच्या नकाशावर आले आहे.
बॉक्स
पर्यटन महोत्सव वादातच
विदर्भात कुठलाही प्रकल्प राबविताना, उभारताना येणारी आर्थिक चणचण आणि राजकीय उदासीनता चिखलदरा पर्यटन महोत्सवात दिसून आली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी सुरू केलेला पर्यटन महोत्सव खंड पडल्यानंतर माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी सिडको प्रकल्प व पर्यटन महोत्सवाला सुरुवात केली. काही वर्षे हा महोत्सव राबविण्यात आला.
बॉक्स
सुरक्षा हवी, नियमांचे पालन अनिवार्य
चिखलदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ठिकठिकाणी फलक लावले असले तरी हुल्लडबाज पर्यटक जीव गमावत असल्याचे चित्र नवीन नाही. आतापर्यंत तीन महिन्यात किमान नऊ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर सुरक्षा हवी, तर पर्यटकांनी नियमाचे पालन करणे गरजेचे ठरले आहे.