आंध्र प्रदेशचा बालक अचलपुरात हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:50+5:302021-08-18T04:18:50+5:30
अचलपूर पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांचा जीव भांड्यात अचलपूर : आंध्र प्रदेशातील सात वर्षीय बालक अचलपुरात हरविल्याची घटना सोमवारी दुपारी ...
अचलपूर पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांचा जीव भांड्यात
अचलपूर :
आंध्र प्रदेशातील सात वर्षीय बालक अचलपुरात हरविल्याची घटना सोमवारी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान उघडकीस आली. नागरिकांसह पोलिसांच्या सतर्कतेने तातडीने शोधून अचलपूर येथील त्याच्या मावशीकडे स्वाधीन केल्यानंतर नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला.
पोलीस सूत्रांनुसार, सैयद मोमीन या युवकास अनोळखी बालक अशरफपुरा परिसरात आढळून आले. त्या बालकाला भाषेची अडचण जात असल्याने नाव व पत्ता सांगता येत नव्हते. तो कुठून आला, याची माहिती पटत नव्हती. अशरफपुरा येथील युवकांनी ही माहिती अचलपूर पोलिसांना दिली. त्या बालकाला महिला अंमलदारांनी ठाण्यात आणले. तो तेलगू भाषेत बोलत असल्याचे लक्षात येताच पीएसआय राजेश भालेराव यांनी आंध्रप्रदेशातील काही जणांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना त्या बालकाने स्वतःचे नाव मणी असे सांगितले. या त्रोटक माहितीच्या आधारे डीबी पथक बालकासह देवडीच्या चावलमंडी मार्केट परिसरात दाखल झाले आणि ध्वनिक्षेपकाद्वारे बालकाबाबत उद्घोषणा केली.
दरम्यान, बालकाची आत्या व नातेवाईक अचलपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. आलिया मोहम्मद राजिक व्यंकटलक्ष्मी (रा. गंजीपेठ जि. विजयनगर, आंध्रप्रदेश) यांनी त्या बालकाचे नातेवाईक असल्याचे सांगितले. योग्य पडताळणी करून ते बालक नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर कारवाई ठाणेदार मनोज चौधरी एपीआय बारड, पीएसआय राजेश भालेराव, पोलीस नाईक पुरुषोत्तम बावणेर, एलपीसी मंजू ढगेसह कर्मचाऱ्यांनी केली.