अतिक्रमण काढण्यात पालिकेकडून भेदभाव
By admin | Published: April 23, 2016 12:11 AM2016-04-23T00:11:31+5:302016-04-23T00:11:31+5:30
शहराला अतिक्रमणाचा विळखा असताना नगरपरिषदेने ते काढण्याची अजूनही हिंमत दाखविली नाही.
स्वयंघोषित नगरसेवकाचा दबाव : वयोवृद्धाची अतिक्रमित भिंत तोडली
अचलपूर : शहराला अतिक्रमणाचा विळखा असताना नगरपरिषदेने ते काढण्याची अजूनही हिंमत दाखविली नाही. परंतु एका वयोवृद्धाने श्रमाच्या पैशातून बांधलेली घराची भिंत तोडली. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. भिंत पाडल्याने वयोवृद्धाचे घर उघडे पडले आहे. ही कारवाई एक नगरसेवक व एका नगरसेविकेच्या पतीच्या दबावाने केल्याची माहिती आहे.
अश्रफपुरा येथे मो. हनीफ मो. इस्माईल (७५) यांचे घर आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घराच्या उत्तर दिशेला आडोसा म्हणून भिंत बांधली होती. २ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी पोलीस पथकासह मोठा लवाजमा घेऊन तेथे हजर झाले. त्यांनी हनीफ यांच्या घराची भिंत तोडण्यास सुरूवात केली तेव्हा ते अक्षरश: साश्रूनयनांनी विनंती करीत होते. माझी भिंत पाडू नका, माझे घर उघडे पडेल, मी कष्टाच्या पैशातून बांधली आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांच्या कानात त्यांची आर्त विनवणी शिरली नाही. भिंत पाडल्यानंतर तिच्या विटाही ते सोबत घेऊन गेले. ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना तो नगरसेवक व नगरसेविकेचा पती दोघेही तेथे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
भिंत पाडल्याप्रकरणी मो. हनीफ मो. इस्माईल यांनी पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना वकील अॅड. व्ही. आर. घाटे यांच्यातर्फे नोटीस पाठविली. त्यात 'माझ्या कष्टाच्या पैशातून पै जमवून मी भिंत बांधली होती. माझे घराचे मोजमाप न करता संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा नकाशा किंवा रेकॉर्ड सोबत न आणता माझ्या घराची भिंत पाडली. यावेळी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चार पोलिसांसह अतिक्रमण विरोधी पथक सोबत आणले होते. खास दोन नगरसेवकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली असून त्यांची नावे त्यांनी नोटीसमध्ये लिहिले आहे. माझ्या शेजारी असलेल्यांचे अतिक्रमण केलेले बांधकाम काढले नाही. ती बांधकामे कोणाची आहे, याचा उल्लेख पाठविलेल्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीस मिळताच माझ्या पाडलेल्या भिंतीच्या विटा परत करून माझे झालेले १२ हजार रुपयांचे नुकसान भरून द्यावे', असेही नोटिसीत म्हटले आहे.