अनैसर्गिक कृत्यातून मुलगा ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:29 PM2019-05-13T23:29:07+5:302019-05-13T23:29:33+5:30
ठार मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीनाने अन्य लहान मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारग्रस्त मुलाला आता एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गैरअर्जदार बालकाच्या वडिलांना नोटीस बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ठार मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीनाने अन्य लहान मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारग्रस्त मुलाला आता एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याप्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गैरअर्जदार बालकाच्या वडिलांना नोटीस बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले.
भातकुली हद्दीतील एकाच गावात दोन मुले शेजारी राहतात. पीडित बालकाची प्रकृती बिघडल्याने वडिलांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तो एचआयव्हीबाधित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हादरलेले वडील व डॉक्टरांनी त्या मुलाला विश्वासात घेतले असता, धक्कादायक प्रकार उघड झाला. सहा महिन्यांपासून घरामागे राहणारा एक मुलगा त्याच्या घरी नेऊन अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे त्या बालकाने डॉक्टर व वडिलांना सांगितले.
अनैसर्गिक कृत्याबाबत कोणाला सांगशील, तर जिवाने मारून टाकेन, अशी धमकी दिल्याने पीडित बालकाने कोणाचजवळच वाच्यता केली नाही. या प्रकाराची पीडित मुलाच्या वडिलांनी रविवारी सायंकाळी भातकुली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी एका १६ वर्षीय विधी संघर्षित बालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३७७, ५०६ (ब) व ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांनी केला. पोलिसांनी पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा अहवाल प्राप्त केला आहे. सोमवारी गैरअर्जदार बालकास पोलिसांनी बोलाविले होते. सोमवारी पोलिसांनी गैरअर्जदार बालकाची इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याला मंगळवारी बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. मंडळाच्या आदेशाने पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
गावात एड्सग्रस्तांची संख्या अधिक
भातकुली हद्दीतील ज्या गावात ही घटना घडली, तेथे एड्सग्रस्तांची संख्या अधिक असल्याची बाब पोलीस चौकशीदरम्यान कानावर पडली. या गावात आरोग्य यंत्रणेकडून शिबिरसुद्धा घेण्यात आले होते. नागपूर व मुंबई येथील आरोग्य विभागाची पथके अनेकदा त्या गावात आरोग्य तपासणी शिबिर घेत असल्याचेही बाब पुढे आली आहे. अनैसर्गिक कृत्य करणारा बालक एड्सग्रस्त असल्यामुळे पीडित बालकालाही त्याची लागण झाली असावी, अशी चर्चा गावात सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अनैसर्गिक कृत्याच्या प्रकरणात संबंधित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी त्या बालकास बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल.
- पंकज दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक, भातकुली