शिक्षकांच्या उपोषणात बच्चू कडूंची उडी

By admin | Published: June 6, 2016 12:09 AM2016-06-06T00:09:17+5:302016-06-06T00:09:17+5:30

गत पाच दिवसांपासून येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ...

Child hunger in the fasting of teachers | शिक्षकांच्या उपोषणात बच्चू कडूंची उडी

शिक्षकांच्या उपोषणात बच्चू कडूंची उडी

Next

शिक्षणमंत्र्यांवर ताशेरे : मुख्यमंत्री ते विधिमंडळ असे आयुध वापरणार
अमरावती : गत पाच दिवसांपासून येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात आ. बच्चू कडू यांनी रविवारी समर्थपणे आंदोलनात उडी घेतली. गत १५ वर्षांपासून शिक्षकांच्या या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री ते विधिमंडळ असे आयुध वापरणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी सायंकाळी वादळ, वारा, पावसाने बेमुदत उपोषणकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. उपोषण मंडपाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले बस्तान शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पोर्च खाली मांडले. यावेळी आ. बच्चू कडू हे शिक्षकांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले. बेमुदत उपोषणकर्त्यांची व्यथा बघून आ. बच्चू कडू भावविभोर झाले. १५ वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांना वेतन नाही. अशातच पाच दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण बघून आ.कडू यांनी मार्गदर्शंन करताना शिक्षण मंत्र्यांच्या खरपूस समाचार घेतला.

-तर आंदोलन उभारावे लागेल
अमरावती : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना कोठे ‘ताव’ घ्यायचा हे अजुनही कळले नाही. एकाच गावात शिक्षणात तफावत असे चित्र आहे. एका शाळेवरील शिक्षकांना अनुदान तर दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना अनुदान नाही, हे विदारक चित्र असल्याचे आ. कडू म्हणाले. शिक्षकांचे चेहरे बघून यांची अवस्था शेतकऱ्यांपेक्षा बिकट झाली आहे. किमान शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाची सोय असून ती तर या शिक्षकांनादेखील नाही. शासनाने उपोषणाची दखल घेतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. त्याकरिता गांधीगिरी नव्हे तर शहीद भगतसिंहाचे विचाराने आंदोलन उभारावे लागेल, असे ते म्हणाले. शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, यासाठी विधिमंडळात तारांकित, लक्षवेधी, विशेष चर्चा घडवून आणण्यासाठी आमदारांचा गट निर्माण केला जाईल. पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विविध आयुधे वापरण्याचा शब्द त्यांनी दिला.
९ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होणार आहे. मात्र हा कालावधी अधिक असल्याने आपण सोमवारी ६ जून रोजी मुख्यमंत्र्यांसोबत व्यक्तिगत बोलून विना अनुदानित शाळा शिक्षकांचे प्रश्न सोडविणार असे आ. कडू म्हणाले. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. आता किमान शिक्षकांना अर्धे तरी अच्छे दिन द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्ष संगीता शिंदे, विना अनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, धोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांची उपोषणस्थळी भेट
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी उशिरा सांयकाळी शिक्षकांच्या बेमुदत उपोषण स्थळी भेट देऊन त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतला. १५ वर्षांपासूनच्या या लढ्याला न्याय मिळवून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सोमवारी ६ जून रोजी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन ना. पोटे यांनी दिले आहे.

आतापर्यंत आंदोलनकर्त्या १७ शिक्षकांची प्रकृती खालावली
गत पाच दिवसांमध्ये बेमुदत उपोषणात १७ शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यात काही उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. बेमुदत उपोषणाला अमरावती विभागातून विना अनुदानित शाळांचे शिक्षक सहभागी झाले आहेत.

सोमवारी मूक मोर्चा
विना अनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपासून सुरु केलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामूहिक मुंडण, रक्तदान केल आहे. मागण्यांची तीव्रता शासन दरबारी पोहचावी, यासाठी सोमवारी ६ जून रोजी दुपारी २ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: Child hunger in the fasting of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.