खंडणीसाठीच केले मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:25 AM2021-02-21T04:25:13+5:302021-02-21T04:25:13+5:30
अमरावती : शहर पोलिसांचे पथक अपहृत चार वर्षीय मुलाला घेऊन अहमदनगरहून शनिवारी सकाळी अमरावतीत परतले. याप्रकरणी पाच आरोपींना अहमदनगहून, ...
अमरावती : शहर पोलिसांचे पथक अपहृत चार वर्षीय मुलाला घेऊन अहमदनगरहून शनिवारी सकाळी अमरावतीत परतले. याप्रकरणी पाच आरोपींना अहमदनगहून, तर सहावा आरोपी या घटनेतील मुख्य सूत्रधार असलेली मुलाच्या दादीला पोलिसांनी शनिवारी अमरावतीतून अटक केली. सर्व आरोपींनी संगनमताने खंडणीसाठीच मुलाचे अपहरण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी पत्रपरिषदेत सांगितले. मात्र, किती पैशांची मागणी ठरली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते पीसीआर दरम्यान कळेलच असेही त्या म्हणाल्या.
याप्रकरणी दोन महिलांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, घटनेतील मास्टरमाईंड असलेला तसेच अहमदनगर जिल्ह्यात अपहरण, घरफोडी तसेच गंभीर स्वरुपाचे १९ गुन्ह्यांत आरोपी केलेला तो पोलीस रेकॉर्डवरील आरोपी इसार शेख ऊर्फ टक्लू अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस पथके घेत आहेत. आमच्यासाठी हा गुन्डा डिटेक्ट करणे आव्हानात्मक होते. कारण यापूर्वीसुद्धा नागपूर शहरात काही वर्षांपूर्वी दोन मुलांचे अपहरण करून त्यांची आरोपींनी हत्या केल्याचे प्रकरण समोर होते. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळून आरोपींचा शोध घेऊन मुलाला सुखरुप आणणे हे महत्वाचे होते. त्यामुळे अमरावती अहमदनगर येथील सीसीटीव्ही फुटेजव्दारे आम्ही गुन्ह्याच्या मुळाशी पोहचू शकलो. यात अमरावती व अहमदनगर येथील पोलीस पथकाने रात्रंदिवस परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावला. त्याबदल पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी डीसीपी शशिकांत सातव, गुन्हे शाखा व राजापेठ पोलीस पथकांचे कौतुक केले. हा गुन्हा डिटेक्ट करताना अहमदनगर पोलिसांचे सहकार्य लाभले. म्हणून मी तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भ्रमणध्वनीवरून त्यांचे आभार मानल्याचे त्या म्हणाल्या.
बॉक्स
सहा आरोपींना अटक
अपहरण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. यात अहमदनगर येथून सपना ऊर्फ हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५), बंबईया ऊर्फ अल्मश ताहीर शेख (१८), मुसाहीब नासीर शेख (२४), आसिफ युसूफ शेख २४), फिरोज रशिद शेख (२५, सर्व रा. कोठला अहमदनगर) यांना अटक केली आहे. मुलाची आजी मोनिका ऊर्फ प्रिया ऊर्फ मुन्नी जसवंतराय लुनिया (४७, रा. शारदानगर) हिला अमरावती येथून अटक करण्यात आली आहे.
बॉक्स
चॉकलेट देताना मुलाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
निरागस अपह्रत मुलाला पत्रपरिषद सुरू असताना पोलीस आयुक्त कार्यालयात आणण्यात आले. तो येताच आपला रियल हीरो आला, असे उद्गार पोलीस आयुक्तांनी काढले. त्याला आपुलकीने जवळ घेऊन चॉकलेट दिले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. नंतर त्याला बसण्याकरिता स्पेशल खुर्ची देण्यात आली. त्याचे उपस्थितांनी कौतुक केले.