बालकांच्या संरक्षणासाठी चाईल्ड लाईन तत्पर
By admin | Published: June 21, 2017 12:13 AM2017-06-21T00:13:22+5:302017-06-21T00:13:22+5:30
बालकांची काळजी व सरंक्षणाच्या उद्देशाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात चाईल्ड लाईनतर्फे सभा घेण्यात आली.
चाईल्ड लाईनची सभा : हव्याप्र मंडळात आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बालकांची काळजी व सरंक्षणाच्या उद्देशाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात चाईल्ड लाईनतर्फे सभा घेण्यात आली. अडचणीत सापडलेल्या बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने कार्य करण्यासंदर्भात सभेत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक संस्थांच्या प्रतिनिधीनी आपल्या संस्थेच्या कार्याची माहिती, कार्यक्षेत्र, बालकांचा वयोगट आणि संबधीत विविध घटकांची माहिती सभेदरम्यान दिली.
चाईल्ड लाईनचे संचालक एस.डी.पाटील व केंद्र समन्वयक सचीन देवे यांनी चाईल्ड लाईनच्या कार्याबद्दल माहिती देऊन आपसातील समन्वयाने बालकांच्या अडअडचणी दूर करण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन उपस्थित प्रतिनिधींना केले. सभेत जिल्हा बालकल्याण सरंक्षण कक्षाचे प्रतिनिधी, नवजीवन केअर सेन्टर, मंदबुध्दी व शारीरिक अंपग विद्यालय, दौलतभाई देसाई मंतिमंद मुलांची शाळा, शासकीय मुलांचे बालगृह व निरीक्षण गृह, शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, सदाशांती बालगृह, नुतन मुकबधीर विद्यालय, युवा परीवर्तन या संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या सभेला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचीव प्रभाकरराव वैद्य, सुरेश देशपांडे, माधुरी चेंडके आणि चाईल्ड लाईन अमरावतीचे संचालक सूर्यकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.