अमरावती जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाने पुन्हा रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 PM2021-04-24T16:04:14+5:302021-04-24T16:05:24+5:30
Amravati news अमरावती जिल्ह्यातील बालविवाहांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील बालविवाहांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वीच मोर्शी तालुक्यात दोन बहिणींचे बाल विवाह रोखल्यानंतर शुक्रवारी पुन्हा अचलपूरमध्ये एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात आला.
बाल संरक्षण कक्ष आणि अचलपूर पोलीस ठाण्याला हा बालविवाह २६ तारखेला होत असल्याची गोपनीय तक्रार मिळाली. तात्काळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले आणि बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी चाईल्ड लाईनचे अमित कपूर व अजय देशमुख यांच्यासोबत अचलपूर गाठले. पोलीस ठाण्यामधून मदत घेऊन वधुपक्षाकडे जाऊन मुलीच्या आई-वडिलांसोबत वर मुलाची बैठक घेऊन त्यांच्याकडून मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्रक लिहून घेण्यात आले तसेच विवाह केल्यास गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. या कार्यवाहीमध्ये अचलपूर पोलीस ठाणे, बाल संरक्षण कक्ष अमरावती व चाईल्ड लाईन प्रतिनिधी होते.
अल्पवयीन बालकाचा विवाह होऊ नये, याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सातत्याने संबधित टेकहोल्डच्या संपर्कात आहे. यामुळेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला यश येत आहे.
- अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी