बालविवाह, गर्भधारणा अन् अर्भकासह मातेचाही मृत्यू! पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: July 12, 2023 04:37 PM2023-07-12T16:37:13+5:302023-07-12T16:37:45+5:30
Amravati News बालविवाहापश्चात ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. छातीत दुखू लागल्याने तिला कुटुंबियांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे पोटातील अर्भक गुदमरल्याने त्या भृणासह त्या अल्पवयीन मातेचाही करूण अंत झाला.
प्रदीप भाकरे
अमरावती: बालविवाहापश्चात ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. छातीत दुखू लागल्याने तिला कुटुंबियांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे पोटातील अर्भक गुदमरल्याने त्या भृणासह त्या अल्पवयीन मातेचाही करूण अंत झाला. ११ जुलै रोजी हा प्रकार अमरावतीत उघड झाला.
याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरा, व चार महिला अशा एकूण सात जणांविरूध्द सदोष मनुष्यवध, बलात्कार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यातील मृत पिडिता ही हिंगोली जिल्ह्यातील असून, घटनास्थळ त्याच जिल्ह्यातील बाभुळगाव आहे. त्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार आहे.
१६ वर्षांच्या पिडिताचा गतवर्षी बालविवाह करण्यात आला. लग्न झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान सहा महिन्यांची गर्भवती असताना १० जुलै रोजी तिच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला येथील जिल्हा सामान्य रूग्णालय व पुढे एका खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, हृदयविकाराने तिचे गर्भातील भृण गुदमरले व पोटातच दगावले. त्यानंतर ११ जुुलै रोजी पहाटे दोनच्या सुमारास ‘आयरन डेफिसिएंशी ॲनिमिया’ ने त्या अल्पवयीन मुलीचाही मृत्यू झाला.
दरम्यान, अल्पवयीन मुलीचा व तिच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाला देखील देण्यात आली. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी येथील ते खासगी रूग्णालय गाठून मृत मुलीच्या आईसह कुटुंबियांचे बयाण नोंदविले. तो विवाह संमतीने झाला होता, असेही बयाणात सांगण्यात आले. मात्र, मृत पिडिता ही अल्पवयीन असल्याने बलात्कार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
हृदयाशी संबंधित आजाराने तिच्या पोटातील बाळ गुदमरल्याने अल्पवयीन मातेचा मृत्यू झाला. मृत पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून सात जणांविरूध्द मंगळवारी गुन्हा दाखल केला. तो हिंगोली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येईल.
गजानन गुल्हाने, ठाणेदार, गाडगेनगर