दोन बहिणीचे बालविवाह राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:54+5:302021-04-21T04:13:54+5:30
अमरावती : मोर्शी तालुक्यातील ग्राम अंबाडा येथे एकाच दिवशी होणारे दोन बालविवाह रोखण्यात मंगळवारी बाल संरक्षण कक्षाला ...
अमरावती : मोर्शी तालुक्यातील ग्राम अंबाडा येथे एकाच दिवशी होणारे दोन बालविवाह रोखण्यात मंगळवारी बाल संरक्षण कक्षाला यश आले. पोलिसांनी सोमवारी याबाबत वधुपक्षाला नोटीस बजावली होती, हे विशेष.
अंबाडा येथे दोन मुलींचे बाल विवाह होत असल्याची माहिती ग्राम बाल संरक्षण समितीला मिळाली होती. समितीच्या सदस्यांनी तात्काळ ही माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी सदर घटना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी सदर बालविवाहाबाबत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अजय डबले यांनी चमूसमवेत मंगळवारी अंबाडा गाठले. ग्राम बाल संरक्षण समितीच्या साथीने लग्नघरी जाऊन विवाह रोखण्यात आले. मुली १८ वर्षांच्या झाल्यावरच लग्न करणार, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. त्यापूर्वी ग्राम बाल सरंक्षण समिती आणि ग्रामपंचायत यांनी मुलींच्या वडिलांना पत्र काढून लग्न न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या कारवाईत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य भूषण कावरे, तालुका महिला संरक्षण अधिकारी रीतेश नामुर्ते, ग्रामसेवक, सरपंच व ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य उपस्थित होते.