बाल सरंक्षण कक्षाने जिल्ह्यात आठ दिवसांत रोखले तीन बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:51+5:302021-06-05T04:09:51+5:30
जिल्ह्यात बालविवाहाचे सत्र सुरूच असून, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम निमखेड बाजार येथे १६ वर्षीय बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय ...
जिल्ह्यात बालविवाहाचे सत्र सुरूच असून, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम निमखेड बाजार येथे १६ वर्षीय बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती अगोदर बाल सरंक्षण कक्षाला प्राप्त झाली. त्यानुसार महिला बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांना कारवाईचे आदेश दिले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पी.बी.नांदने व अंजनगाव सुर्जी पोलिसांशी संपर्क करून सदर बालिकेची जन्मतारीख अंगणवाडी सेविका व जि. प. शाळेकडून पळताळणी करण्यात आली. तेव्हा बालिका १६ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस पाटील दिनेश तनपुरे, ग्रामसेवक देशमुख, तलाठी रंजना गावंडे यांना सोबत घेऊन विवाहस्थळ गाठण्यात आले. बालिकेच्या पालकांना तसेच वर मंडळींना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होईस्तोवर लग्न न करण्याबाबत बंधपत्र लिहून घेण्यात आले. बालविवाहाबाबत समुपदेशन करण्यात आले. ही कारवाई बालसरंक्षण कक्षाच्या विधी तथा परिविक्षा अधिकारी सीमा भाकरे, पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी कर्मचारी विश्वनाथ राठोड, अंगणवाडी सेविका, तलाठी, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आली.