मेळघाटात बालमृत्यूचे तांडव, शेकडो बालक आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:18 PM2018-09-19T22:18:45+5:302018-09-19T22:19:17+5:30
मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटच्या धारणी तालुक्यात १५ दिवसांत तब्बल ३०, तर चिखलदरा तालुक्यात ६ अशा एकूण ३६ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील एकट्या बिजुधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत १० बालकांचा समावेश असून, दोन्ही तालुक्यांत शेकडो बालक सर्दी खोकला ताप या आजाराने ग्रस्त असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे
धारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० कुपोषित बालकांनी अखेरचा श्वास घेतला, तर बिजुधावडी अंतर्गत येणाऱ्या २३ गावांमध्येच १० बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिखलदरा तालुक्यात ६ बालके दगावलीत. आॅगस्ट महिन्यात धारणी तालिक्यात ४५, चिखलदरा तालुक्यात ९ बालकांचा मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले होते. परंतु, पंधरा दिवसांतच ३६ बालकांचा मृत्यू झाले आहेत.
शेकडो बालक सर्दी, खोकला, तापाने ग्रस्त
धारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो बालक सर्दी खोकला तापाने फणफणत आहेत. आरोग्य यंत्रणेने याला दुजोरा दिला असून एकूण बालकांपैकी ५० टक्के बालक ग्रस्त असल्याने त्यांना निमोनियापासून वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजारावर जादूटोणा भूमकाचा उपचार
मेळघाटात आजही आदिवासी भूमका (मांत्रिक)कडे उपचार घेतात. सर्दी खोकलासाठीसुद्धा आरोग्य केंद्रात येत नसल्याने आरोग्य विभागाची कसरत होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांनी सांगितले. दुसरीकडे सर्व औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णवाहिका असल्याचे सांगण्यात आले. मात्र बालमृत्यूचे प्रमाण कमी वाढतच आहे
धारणी तालुक्यात १५ दिवसांत ३० बालकांचा मृत्यू झाला. एकट्या बीजुधावडी आरोग्य केंद्रात १० बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्दी, खोकला, तापाने मोठ्या प्रमाणात बालक ग्रस्त आहेत. आरोग्य केंद्रात त्यांना भरती केल्या जात आहे.
- शशिकांत पवार,
तालुका आरोग्य अधिकारी, धारणी