चिमुकलीच्या मृत्यूनंतर नातलगांचा उद्रेक, धामणगावात हॉस्पिटल साहित्याची जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 09:29 PM2017-11-01T21:29:57+5:302017-11-01T21:30:15+5:30
धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली.
धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली. तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांना अश्रुधूर व लाठीहल्ला करावा लागला. परिणामी धामणगावात काही काळ कर्फ्यूसदृश स्थिती निर्माण झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, समुद्रपूर नजीकच्या मांडगाव येथील प्रशांत ठाकरे यांची मुलगी निधी तिच्या आईच्या माहेरी धामणगाव तालुक्यातील कावली येथे आली होती. पायावर लोखंडी वस्तू पडल्याने तिला ताप आला. तिला धामणगाव येथील डॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती खालावत गेली. यादरम्यान डॉक्टरांनी उपचाराचे १५०० रुपये जमा करा, मुलगी काही वेळाने शुद्धीवर येईल, असे सांगितले. दोन तासांनंतर मात्र लगेच नागपूरला घेऊन जा, असे सांगत असतानाच निधीच्या नाका-तोंडातून फेस बाहेर पडला. ती दगावली. ही वार्ता शहरात वा-यासारखी पसरली.
सकाळी १० वाजता घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांचा रोष वाढतच गेला. अखेर चार तासांनी डॉ. अशोक सकलेचा व डॉ. सारिका सकलेचा या डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. नागरिकांचा रोष पाहता, या दाम्पत्याला चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी संतप्त नागरिकांवरही लाठीहल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार घटनास्थळी पोहोचले. रॅपिड अॅक्शन फोर्सने रुग्णालय परिसराचा ताबा घेतला आहे.
कारसह साहित्याची जाळपोळ
सुमारे तीन हजारांवर जमावाने हॉस्पिटलची तोडफोड सुरू केली. हॉस्पिटलमधील काचा, खिडक्या फोडल्या. खाटा, कुलर व अन्य साहित्य बाहेर काढून आगीच्या स्वाधीन करण्यात आले. टीव्हीची तोडफोड केली, तसेच घराजवळ पार्क केलेली डॉ. सकलेचा यांची नवी कार व दुचाकीही जाळण्यात आली.