सिनेसृष्टीच्या मोहात घरदार सोडून मुंबईची वाट पकडतात मुले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:16+5:302021-08-25T04:17:16+5:30
श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : हीरोसारखे बनायचे म्हणून घर सोडून मुंबईला पलायन करणाऱ्या रायपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन ...
श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : हीरोसारखे बनायचे म्हणून घर सोडून मुंबईला पलायन करणाऱ्या रायपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला बडनेरा रेल्वे स्थानकाहून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. पैसा, ग्लॅमरस दुनियेचा नाद व घरातील कौटुंबिक वाद यांसह इतरही कारणांमुळे मुले पळून जाण्याचे प्रमाण बरेच आहे.
गेल्या साडेतीन वर्षात बडनेरा रेल्वे स्थानकावरून १२६ मुला-मुलींना पळून जात असताना ताब्यात घेतले. त्यांची संपूर्ण चौकशी करून रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस व चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचविण्यात आले. प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून विचारणा केली जाते. बहुतांश मुले सिनेसृष्टीच्या नादात रेल्वे गाड्यांमधून मुंबईकडे पळून जात असल्याची उदाहरणे पोलिसांच्या माहितीतून समोर आली. त्याचप्रमाणे आई-वडिलांची घरातील भांडणे, त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम यामुळेदेखील मुले घरून निघून जातात. २०२० या कोरोनाच्या वर्षात रेल्वे गाड्या फारशा सुरू नव्हत्या. यादरम्यान पळून जाणाऱ्यांची संख्या अगदी कमी असल्याचे आकडेवारीतून समोर आले. रेल्वेगाड्या सुरू होताच संख्या वाढली आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
घर सोडून जाण्याची कारणे...
बॉक्स
1) अनेक मुले ग्लॅमरस दुनियेच्या मोहापायी आई-वडिलांच्या नकळत मुंबईकडे पळून जात असल्याचे पुढे आले. हीरो- हीरोईन व्हायचे, भरमसाठ पैसा कमवायचा, माझ्याकडे महागड्या गाड्या असल्या पाहिजे, ही मनीषा असतेच. आई-वडिलांची भांडणे, शिक्षणाचा कंटाळा अशी विविध धक्कादायक कारणे समोर आली आहेत.
बॉक्स
2) १० डिसेंबर २०२० रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावरील विश्रामगृहात रायपूरचा तेरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होता. रेल्वे पोलिसांनी त्याला विचारणा केली. तो घरून पळून आल्याचे समोर आले. त्याच्या डोक्यात हीरो बनण्याचे स्वप्न होते. पोलिसांनी आई-वडिलांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या सुपूर्द केले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्रतिक्रिया-
सामाजिक जबाबदारीतून पळून जाणाऱ्या मुलांचे समुपदेशन केले जाते. पळून जाण्यामागील कारणे शोधली जातात. संपूर्ण चौकशीअंती नियमांच्या अधीन त्या मुलांना आई-वडिलांच्या सुपूर्द केले जाते.
बी.एस. नरवार, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल.
प्रतिक्रिया-
विविध कारणांमुळे मुले घरून निघून जात असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या जातात. कुटुंबात परत जाण्यासाठी समुपदेशन केले जाते. बऱ्याच मुला-मुलींना आई-वडिलांच्या सुपूर्द करण्यात आले.
अजितसिंह राजपूत, सहायक निरीक्षक, रेल्वे पोलीस
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* स्थानकावर सापडलेली मुले-
२०१८ सालात - १६
२०१९ सालात - ५३
२०२० सालात - ०५
२०२१सालात - ५२ ऑगस्ट महिन्यापर्यंत
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^