मोबाईलची बॅटरी फुटल्याने बालकाचा भाजला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:21 AM2019-05-30T01:21:16+5:302019-05-30T01:21:42+5:30
भंगारात पडलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षीय बालकाच्या हाताचा पंजा गंभीररीत्या भाजल्या गेला. धारणी तालुक्यातील धोदरा गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. राजेंद्र संजू कासदेकर (१०, रा. धोदरा, ता. धारणी) असे भाजलेल्या बालकाचे नाव आहे.
जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
अमरावती : भंगारात पडलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने १० वर्षीय बालकाच्या हाताचा पंजा गंभीररीत्या भाजल्या गेला. धारणी तालुक्यातील धोदरा गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. राजेंद्र संजू कासदेकर (१०, रा. धोदरा, ता. धारणी) असे भाजलेल्या बालकाचे नाव आहे. तो मोबाइलची बॅटरी व पेन्सिल सेलचे कनेक्शन वायरने जोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक बॅटरी फुटून स्फोट झाला.
राजेंद्र कासदेकर या बालकाचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजेंद्र हा धोदरा येथील एका शाळेत चौथ्या वर्गात शिकतो. मंगळवारी आई-वडील मजुरीसाठी गेल्यावर राजेंद्र मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, शेणखताच्या ढिगाऱ्यावर मोबाइलची बॅटरी असल्याचे राजेंद्रला दिसले. त्याने बॅटरी उचलून हातात घेतली. त्यानंतर घरात पडलेल्या पेन्सिल सेल व एक तारेचा तुकडा घेतला. मोबाइल बॅटरी उजव्या हातात घेऊन तो पेन्सिल सेलचे कनेक्शन तारेच्या माध्यमातून जुळवित होता. यादरम्यान अचानक बॅटरी फुटली आणि स्फोट झाला. त्यामुळे राजेंद्रच्या हाताचा पंजा गंभीररीत्या भाजल्या गेला. अचानक झालेल्या स्फोटामुळे त्याच्या मित्रांनी घराकडे धाव घेतली. राजेंद्रसोबत घडलेली घटना त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर काही गावकऱ्यांनी राजेंद्रच्या आई-वडिलांना बोलावून त्याला तत्काळ धारणीतील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी रात्री राजेंद्रला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. इर्विन चौकातील पोलिसांनी राजेंद्रचे बयाण नोंदविले आहे. सद्यस्थितीत राजेंद्रवर वार्ड क्रमांक १३ मध्ये उपचार सुरू आहेत.