‘मुलाचा जीव तर गेलाच, आता तुमचा विचार करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:16 PM2017-12-26T23:16:41+5:302017-12-26T23:17:32+5:30
महापालिका आयुक्तांविरुद्धची तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलाचा जीव तर गेलाच, आता तुमचा विचार करा, अशी गर्र्भित धमकी सुधीर गावंडेंचे वडील साहेबराव गावंडेंना देण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिका आयुक्तांविरुद्धची तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलाचा जीव तर गेलाच, आता तुमचा विचार करा, अशी गर्र्भित धमकी सुधीर गावंडेंचे वडील साहेबराव गावंडेंना देण्यात आली. त्यांनी यासंदर्भात आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांनी ११ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गाणूवाडी स्थित घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सुधीर गावंडे यांच्या पती जया आणि वडील साहेबराव गावंडे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली. महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी सुधीर गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्या तक्रारीतून करण्यात आला. ती आत्महत्या नसून हत्याच आहे, हे सर्व करण्यास आयुक्त व डॉ. बोंद्रे यांनी त्यांना प्रवृत्त केले. त्यामुळे या दोघांची पोलीस चौकशी न होता, सीबीआय चौकशी करावी, अशी आर्जव डॉ. जया गावंडे यांनी केली होती.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
१२ डिसेंबरला दुपारच्या सुमारास ही तक्रार नोंदविल्यानंतर सुधीर गावंडेंच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अचलपूर तालुक्यातील सावळी या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. सावळी येथे दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अत्यंयात्रा सुरू झाल्यावर एक अज्ञात इसम आपल्या मागे गर्दीमधून चालत आला व त्याने आपल्याला धमकावले. तुम्ही आयुक्तांविरुद्ध दिलेली तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलाचा जीव गेला; आता तुमचा विचार करा, अशी धमकी देऊन तो अज्ञात तेथून निघून गेला. तो माझ्या पाठीमागे असल्याने चेहरा बघता आला नाही, असेही साहेबराव गावंडे यांनी स्पष्ट केले आहे. साहेबराव गावंडे यांनी १४ डिसेंबरला रात्री ८.४५ वाजता ही तक्रार आसेगाव पोलिसांनी नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
राजापेठ पोलिसांनी नोंदविले जया गावंडेंचे बयान
जया व साहेबराव गावंडे यांच्या लेखी तक्रारीनंतर सुधीर गावंडे आत्महत्या प्रकरणाबाबत राजापेठ पोलिसांनी महापालिकेला आनुषंगिक माहिती मागविली. त्या दस्तऐवजाची खातरजमा केली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास राजापेठचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी जया गावंडे यांचे बयान नोंदविले. तीन तास बयाणाची प्रक्रिया चालली. जया व सुधीर गावंडे यांच्या विवाहापासूनचा संपूर्ण घटनाक्रम मेहेत्रे यांनी नोंदवून घेतला. १२ डिसेंबरला नोंदविलेल्या तक्रारीमध्ये जया गावंडे यांनी जे मुद्दे उपस्थित केले, त्यावर त्या ठाम राहिल्या.
म्हातारी झाले तरी ठाम राहील!
‘राजापेठ पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीसह मी माझ्या बयाणावरही तेवढीच ठाम आहे. म्हातारी झाले तरी तेच सांगेल,’ असा विश्वास जया गावंडे यांनी व्यक्त केला. सचिन बोंद्रे यांनी वेळोवेळी दिलेला त्रास आणि प्रशासनप्रमुख म्हणून हेमंत पवार यांनी त्यांचे निलंबन काळातील रोखलेले वेतन व अन्य प्रशासकीय बाबींमुळेच ते अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे गावंडे यांनी त्यांच्या बयानात नमूद केले आहे.
गावंडे यांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सावळी येथील काही ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली. तथापि, अद्यापपर्यंत ठोस असा सुगावा लागला नाही.
- अखिल दळवी, स्टेशन अंमलदार, आसेगाव पूर्णा पोलीस ठाणे.
सुधीर गावंडेंच्या आत्महत्याप्रकरणात त्यांनी नोंदविलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी जया गावंडे याचे बयाण नोंदविण्यात आले. चौकशी सुरू आहे.
- गजानन मेहेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक