अमरावती जिल्ह्यातल्या राजुरा बाजारच्या मिरचीला सुगीचे दिवस; परदेशात प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:38 AM2018-01-11T10:38:05+5:302018-01-11T10:41:24+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.
संजय खासबागे
अमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट आहे. त्याला पर्याय म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. परिणामी राजुराबाजार येथील प्रसिद्ध बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे.
मागील दोन वर्षांत मिरचीचे उत्पादन कमी झाले. यंदा रोगराई नसल्याने लागवड कमी असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. राजुराबाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची बाजारपेठेत दिवसागणिक दोन ते अडीच हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. उत्पादकांना २५ ते २६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळत आहे. या बाजारपेठेत परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्टी, काटोल, नरखेड, जलालखेडा, मध्यप्रदेशातील मुलताई, पांढुर्णा या परिसरातून शेतकरी मिरची विकण्यासाठी येतात.
वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुरा बाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी ही बाजारपेठ आहे. हंगामात दिवसागणिक २० ते २५ हजारांपर्यंत कृषी मालाचा सेस बाजार समितीला मिळत असते. तर वाहतूकदार व ट्रक चालकांनादेखील वेळेत माल पोहचता केल्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
एका रात्रीत कोट्यवधींचा व्यवसाय
विदर्भात रात्रीतून चालणारी एकमेव बाजारपेठ असून येथे सायंकाळी ७ वाजता सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू असते. एका रात्रीत या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. व्यापाऱ्यांकडून नगदी रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी ताटकळत बसावे लागत नाही.
अरब राष्ट्रातही प्रसिद्ध
राजुरा बाजार येथील मिरची बाजारातून कोलकाता, मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथील शेतकऱ्यांचा माल पाठविण्यात येतो. यासोबतच पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, सौदी अरेबियासह अरब राष्ट्रात येथील मिरची प्रसिद्ध असल्याने व्यापारी मिरचीची निर्यात करतात.
यंदा मिरचीची प्रत व भाव चांगला आहे. मात्र ती वेळेत पोहचविणे जिकरीचे काम आहे. रेल्वेने प्राधान्यक्रम देऊन वाहतूक झाल्यास राजुरा बाजारच्या बाजारपेठेचा विकास होऊ शकतो, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- अनिल चांडक,
मिरची व्यापारी, राजुरा बाजार