ऐन दिवाळीच्या तोंडावर एटीएममध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:00 AM2020-11-13T05:00:00+5:302020-11-13T05:00:30+5:30
बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. काही एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे आढळून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या को-ऑपरेटिव्ह बँकांचे एटीएम उभारण्यात आलेले आहेत. बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. काही एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे आढळून येत आहे.
स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे एटीएम बँक शाखेला लागूनच आहे. मात्र हे एटीएम अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याकडे शाखा व्यवस्थापकाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद अवस्थेत असल्याचा अनेक ग्राहकांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे.