चिमुकल्यांचा जीव धोक्यात, अपघात वाचवण्यासाठी हवे तीन लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:25+5:302021-08-14T04:16:25+5:30
फोटो - जावरे १ २ ३ ४ मेळघाटच्या बीबा गावात अंगणवाडी, शाळेच्या आवारातच विद्युत डीबी फोटो - अंगणवाडी केंद्र ...
फोटो - जावरे १ २ ३ ४
मेळघाटच्या बीबा गावात अंगणवाडी, शाळेच्या आवारातच विद्युत डीबी
फोटो - अंगणवाडी केंद्र शाळा असलेल्या पटांगणावर अपघात होण्याची भीती आहे.
लोकमत विशेष
चिखलदरा : तालुक्याच्या अतिदुर्गम बिबा गावात शाळा आणि अंगणवाडी केंद्र असलेल्या आवारातच जिवंत विद्युत तारांची डीबी सताड उघडी पडून आहे. चिमुकले दिवसभर येथे खेळतात. अपघात टाळण्यासाठी दोन लक्ष ७५ हजार रुपयांची गरज आहे.
तालुक्याच्या दुर्गम बिबा गावात जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रे एकाच ठिकाणी आहे. त्या पटांगणावर गावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी डीबी लावण्यात आली. डीबीचा बॉक्स सताड उघडा राहत असल्याने त्यातून जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन अपघाताची भीती कायमची झाली आहे. डीबी अगोदर उभारण्यात आली, त्यानंतर अंगणवाडी व शाळा इमारती येथे झाल्या.
बॉक्स
इस्टिमेट सादर, निधीची गरज
महावितरणच्यावतीने जारिदा येथील उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मोहित गावंडे यांनी स्वतःहून या गंभीर प्रकाराची दखल घेतली. डीबी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी आवश्यक व सर्व कागदपत्रे आणि इस्टिमेट सादर केले आहे. टीएसपी योजनेतून २ लक्ष ७५ रुपयांची आवश्यकता आहे. बिबा ग्रामपंचातीचे सदस्य मंगल चतुर यांनी यासंदर्भात अनेकदा प्रशासनाला अर्ज केले. पण, सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
बॉक्स
अपघाताला आमंत्रण
कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी अंगणवाडी केंद्रांचा आहार पुरवठा आणि गावाच्या मध्यभागी अंगणवाडी केंद्र असल्याने चिमुकल्यांना खेळण्यासाठी ही जागा आहे. त्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारी ही डीबी तात्काळ पाठवावी, अशी मागणी आदिवासींनी केली आहे.
कोट
डीबीसंदर्भात आपण स्वतः दखल घेत इस्टिमेट वरिष्ठ कार्यालयाला सादर केले. त्यासाठी २ लक्ष ७५ हजारांची गरज आहे. निधी उपलब्ध होताच सुरक्षित अंतरावर लावण्यात येईल.
- मोहित गावंडे, कनिष्ठ अभियंता, उपकेंद्र जरिदा