चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी मातेला चार दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:00+5:302020-12-06T04:13:00+5:30
अमरावती : दीड महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण व अंगणातील विहिरीत मृतदेह साप़डल्याच्या प्रकरणात त्या चिमुकल्याच्या मातेला शनिवारी राजापेठ पोलिसांनी न्यायालयात ...
अमरावती : दीड महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण व अंगणातील विहिरीत मृतदेह साप़डल्याच्या प्रकरणात त्या चिमुकल्याच्या मातेला शनिवारी राजापेठ पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती राजापेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी दिली.
न्यू प्रभात कॉलनीत चौहान कुटुंबाच्या घरातील अंगणात असलेल्या विहिरीत दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह सोमवारी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सात ते आठ जणांचे बयाण नोंदविले. यामध्ये मृताची आई नम्रता व बिहार राज्यातून आलेल्या पतीचाही समावेश होता. पोलिसांची संशयाची सुई बाळाच्या आईवरच असल्याने परिस्थिजन्य पुराव्यावरून तिला शुक्रवारी राजापेठ पोलिसांनी अटक केली. आता चार दिवसांच्या तिच्याकडून खुनाच्या गुन्ह्याची कबुली मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने स्वत: पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दोनदा राजापेठ ठाण्याला भेट देऊन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व राजापेठचे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्याकडून या प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात तपासाची दिशा ठरविण्यात आली. अपहरण बाहेरची व्यक्ती करू शकत नाही, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचली. एक-एक धागा उलगडत गेला. यादरम्यान मृताच्या आईची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, बाळाला विहिरीत कुणी व का टाकले, याचा उलगडा पोलिसांना होऊ शकला नाही. मात्र, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यानुसार पोलिसांनी नम्रता हिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.