चिंचोलीच्या युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या

By admin | Published: September 28, 2016 12:09 AM2016-09-28T00:09:50+5:302016-09-28T00:09:50+5:30

अंजनगाव मार्गावर सोमवारी मध्यरात्रीदरम्यान इटकी ते लेहेगाव दरम्यानच्या एका शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

Chincholi's youth thugs slit and murdered | चिंचोलीच्या युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या

चिंचोलीच्या युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या

Next

इटकी फाट्यावरील घटना : सोमवारी मध्यरात्री घडला थरार, आरोपी फरार
लेहगाव / दर्यापूर : अंजनगाव मार्गावर सोमवारी मध्यरात्रीदरम्यान इटकी ते लेहेगाव दरम्यानच्या एका शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी सकाळी शेतीच्या कामाला जाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी गावच्या पोलीस पाटलांना ही माहिती दिली. पश्चात पोलिसांना पाचारण करण्यात आले. अमर सुखदेवराव साबळे (३२,रा.चिंचोली रहिमापूर) असे मृताचे नाव आहे.
सोमवारी रात्री ११ वाजतादरम्यान मृत अमर साबळे हा लहान भाऊ सचिनची दुचाकी घेऊन दर्यापूरहून चिंचोलीकडे निघाला. रात्री १२ वाजताच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी परिसरात अज्ञात आरोपींनी अमर याचा गळा व नाक कापून आणि डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नालीत फेकून दिला. घटनास्थळानजीकच्या नालीत मृत अमर याची एम.एच.३०-यू.-२३८ क्रमांकाची दुचाकीदेखील मोडतोड झालेल्या स्थितीत आढळून आली.
मृत अमर साबळे हा ‘मैत्रेय’ कंपनीचा एजंट म्हणून कार्यरत होता. त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ व बहीण, पत्नी असा परिवार आहे. या घटनेची माहिती इटकीचे उपसरपंच गोपाल अरबट यांनी तातडीने पोलिसांना दिली. पश्चात लगेच दर्यापूर येथून पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. शवविच्छेदनानंतर अमर साबळेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)

घटनास्थळी बघ्यांची गर्दी
घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्याने हा मार्ग अवरूद्ध झाला होता. पोलिसांनी गर्दी पांगविली. येवद्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर, दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश टेकाडे, जमादार कमलेश मुराई, नरेंद्र मुळतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली.

फॉरेन्सिक पथकाला पाचारण
घटनेचा तपास करण्यासाठी अमरावती येथून श्वानपथकासह फिंगर प्रिंट एक्सपर्ट, स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळावरील मृताच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेचा तपास युद्धस्तरावर आरंभला आहे.

शवविच्छेदनानंतर युवकाची हत्याच झाल्याचे स्पष्ट होते. त्या दिशेने तपास सुरू केला असून लवकरच निष्कर्षाप्रत पोहोचू.
-नितीन गवारे, ठाणेदार, दर्यापूर

फॉरेन्सिक लॅबला सर्व नमुने पाठविले आहेत. शवविच्छेदनानंतर युवकाची हत्याच झाल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
- सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर

Web Title: Chincholi's youth thugs slit and murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.