चायनिज मांजामुळे भंगले तिचे रूग्णसेवेचे स्वप्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:14+5:302021-06-23T04:10:14+5:30
पित्याकडून पोलिसांत तक्रार : विक्रेत्यांवर व्हावी कारवाई अमरावती: तिला परिचारिका बनून रूग्णसेवा करायची होती. कुटुंबियांचा, सुरक्षारक्षक असलेल्या वडिलांचा तिला ...
पित्याकडून पोलिसांत तक्रार : विक्रेत्यांवर व्हावी कारवाई
अमरावती: तिला परिचारिका बनून रूग्णसेवा करायची होती. कुटुंबियांचा, सुरक्षारक्षक असलेल्या वडिलांचा तिला आधार बनायचे होते. मात्र, एका आकस्मिक क्षणी या स्वप्नांचा चुराडा झाला. रक्तबंबाळ अवस्थेत आगतुकांनीच तिला रूग्णालयात हलविले. मात्र चायनिज मांजाने तिच्या गळ्याचा खोलवर वेध घेतला होता. उपचारापुर्वीच तिने जिल्हा सामान्य रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दिव्या शंकरराव गवई (२३, रा. पुंडलिकबाबा नगर गल्ली नं ४) असे चायनिज मांजाचा बळी ठरलेल्या तरूण विद्यार्थीनीचे नाव.
याप्रकरणी मंगळवारी दुपारी तिचे वडील शंकरराव गवई यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परिचारिकेचे प्रशिक्षण घेणारी दिव्या ही नजिकच्या परिसरातील एका रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होते. सोमवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास आपल्या मोपेडने जात असताना समर्पण कॉलनी भागात अचानक तिच्या गळ्याला चायनिज मांजा छेदून गेला. ती तशीच दुचाकीसह खाली कोसळली. मांजा म्हणून ओरडली. तसेच वॉकिंग करणारे रमेश बिजवे नामक गृहस्थ तिचे जवळ गेले. कॉलनीतील एका दुधडेअरीजवळ ती गळयाला हात लावून विव्हळत होती. बिजवे यांनी तिला प्रथम एका खासगी रूग्णालयात नेले. मात्र तेथे न घेतल्याने तिला इर्विनमध्ये हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान सोमवारी रात्री १० च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
काय आहे तक्रारीत
याबाबत मृताचे वडील शंकर गवई (४४) यांच्या तक्रारीनुसार, कुणीतरी निष्काळजीपणे पतंग उडवून, त्या पतंगीच्या मांज्याने गळा कापण्यास, तिचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरले, त्यावर कार्यवाही व्हावी, असे नमूद आहे.
चायनीज मांजामुळे झाला होता चिमुकल्याचा मृत्यू
पतंग उडवताना वापरल्या जाणाºया चायना नावाने ओळखल्या जाणाºया मांजाने सातवर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याची दुदैर्वी घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथे १५ जानेवारी २०२० रोजी उघड झाली होती.
बंदी असूनही चायनीज मांजाची विक्री
बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू असल्याने या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊ न रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात.