६० कोटींतून साकारतोय चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:11 PM2018-05-23T22:11:31+5:302018-05-23T22:11:49+5:30
येथील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू झाले असून, ६० कोटींच्या निधीतून सदर पूल साकारला जाणार आहे. कंत्राटदाराला या पुलाचे काम दोन वर्षात म्हणजे ३ जानेवारी २०२० पर्यंत करायचे आहे.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू झाले असून, ६० कोटींच्या निधीतून सदर पूल साकारला जाणार आहे. कंत्राटदाराला या पुलाचे काम दोन वर्षात म्हणजे ३ जानेवारी २०२० पर्यंत करायचे आहे.
आठ दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये चित्रा चौकात पिल्लरच्या फाऊंडेशनचे काम होत आहे. यामध्ये चित्रा चौकातील नागपुरी गेटकडे असोरिया पेट्रोल पंपाजवळ उतरणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी ८२० मीटर एवढी आहे. याच पुलावरून भातकुली मार्गावर उतरणारी लांबी ही १३० मीटर अशी एकूण लांबी ही ९५० मीटर एवढी आहे. याच टेंडरमध्ये मालवीय चौक ते नागपुरी गेट चौकापर्यंत पुलाखालील रस्त्याचे काँक्रीटीकरण, दोन्ही बाजूच्या नाल्या व त्यावर पेव्हर बसविण्याची कामे केली जातील. ही कामे चाफेकर कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले असून, केंद्रीय मार्ग निधीतून सदर कामे ही करण्यात येत आहे.
चित्रा चौक ते नागपुरी गेट, चांदणी चौकापर्यंत नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. इतवारा बाजारात तर दिवसभर जड वाहने जाण्यासाठी जागा नसते. त्यामुळे सदर मार्गावर उड्डाणपूल ही प्राथमिक गरज ठरली आहे. त्यामुळे आमदार सुनिल देशमुख यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सहकार्याने केंद्रीय मार्ग निधीतून या कामासाठी निधी मंजूर करून आणला आहे. दोन महिन्यांपूर्वीच सदर कामांचे भूमिपूजन हे करण्यात आले होते. या कामाची मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी पाहणी केली आहे. उपअभियंता आशुतोष शिरभाते यांच्या नियंत्रणात उड्डाणपुलाचे बांधकाम कंत्राटदारामार्फत होत आहे.