कॉलरा दोन पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:43 PM2018-03-21T22:43:49+5:302018-03-21T22:43:49+5:30
उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे.
संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे. दूषित पाण्याचा हा परिणाम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
येथील राजापेठस्थित एका खासगी रूग्णालयात १६ मार्च रोजी कॉलरा आजाराचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. या रूग्णालयातून महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर त्या रूग्णांचे १८ मार्च रोजी शौच नमुने तापसणीसाठी पाठविण्यात आले. हल्ली शहरात नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. अनेक ठिकाणी नाली खोदकामांमुळे जलवाहिनींचे लिकेजसमधून घाण पाण्यावाटे जात असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात साथरोगाची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान स्थानिक गणेशनगर येथील एका २० वर्षीय रूग्ण असलेल्या मुलीला तीन दिवसांच्या उपचारानंतर सुटी देण्यात आली, तर साईनगरातील एका ५० वर्षीय महिलेवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालयाकडून मिळाली आहे. रूग्णांवर उपचार सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी महापालिका आरोग्य विभागाने नमुने घेतल्यामुळे प्रयोगशाळेच्या अहवालात तफावत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काय आहे कॉलरा?
कॉलरा हा एक प्रकाराचा डायरियापेक्षा गंभीर आजार आहे. यामुळे सतत शौचाला जावे लागते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन किडनी व इतर अवयव निकामी होण्याची शक्यता असते. यामुळे पोटात वेदना होतात. गतीने पाण्याचे प्रमाण कमी होते. त्वरित उपचार न केल्यास जीवाला धोका होऊ शकतो.
यामुळे होतो कॉलरा?
दूषित पाणी पिण्यात आल्याने व उघड्यावरील अन्न खाल्ल्याने कॉलराचे जंतू पोटात जातात. हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे.आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होऊ शकते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. वेळीच उपचार झाल्यास बरे होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागू शकतो.
दोन्ही रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. मात्र, या रुग्णांचे नमुने निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
- डॉ. सीमा नेताम, आरोग्य अधिकारी महापालिका
दोन्ही रुग्णांचे शौच नमुने कॉलरा पाझिटिव्ह आल्याने याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास दिली. उपचारानंतरच्या नमुने तपासणी अहवालामध्ये फरक पडतो.
- डॉ. मनोज निचत, एमडी