अमरावतीमधील सर्वाधिक बँक खातेदारांचा चोरला डेटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:52 PM2017-12-31T23:52:57+5:302017-12-31T23:53:49+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यु-ट्युबच्या माध्यमातून बनावट एटीएम बनविणाऱ्या टोळीने अमरावतीतील सर्वाधिक बँक खातेदारांचा डेटा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेतलेल्या हरिदास हरविलास विस्वास (२९,रा. मलकानगिरी, ओडीशा), विशाल तुळशीराम उमरे (३४,रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०,रा. गाजीपुर, दिल्ली) या तिघांनाही न्यायालयाने ३ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाऱ्या या टोळीतील मुख्य सूत्रधार हरिदास विस्वास याने त्याचा साथीदार विशाल उमरे याच्या माध्यमातून अमरावतीमधील बँक खातेदारांचा डेटा चोरला आहे. विशाल उमरे हा मे महिन्यात अमरावतीतील एका लॉजवर राहत होता. दररोज शहरातील विविध एटीएमची झडती घेत होता. ज्या ठिकाणी गर्दी अधिक आहे, त्या एटीएमवर रांगेमध्ये उभा राहरून खातेदाराच्या एटीएमवर लक्ष केंद्रित करून त्यावरील अंक स्मरणात ठेवून तत्काळ अंक विस्वासच्या मोबाईलवर पाठवित होता. एसबीआयची बडनेरा शाखा, शाम चौक स्थित मुख्य शाखा, राठीनगर व गाडगेनगरातील शाखेतून एटीएमधारकांची माहिती चोरल्याची कबुली विशालने पोलिसांना दिली.
एटीएम, शॉपिंग मॉलमधील ग्राहकलक्ष्य
विस्वासचे सहकारी एटीएम, शॉपिंग मॉल व अन्य आॅनलाईन खरेदीच्या ठिकाणी बँक खातेदारांचा डेटा चोरायचे. विशाल उमरे याच कामासाठी अमरावतीत आला आणि तो निर्मला लॉजवर राहिल्याची कबुली पोलिसांनी दिली. बँक खातेदारांच्या मागे उभे राहून शोल्डर रिडिंगचा फंडा वापरून तो नागरिकांच्या हातातील एटीएमवर लक्ष वेधायचा. त्यावरील १६ पैकी आठ अंक जवळपास सारखेच असायचे. त्यामुळे केवळ शेवटचे चार अंक मोबाईलवर टाईप करून ते लगेच विसवासला पाठवायचे. पैसे विड्रॉल करणाऱ्या खातेदार कोणता पिनकोड टाईप करतो. याकडे तो लक्ष ठेवायचा. ते चार अंक मेमोरीत ठेवून काही वेळानंतर तो पीनकोड विस्वासला पाठवायचे काम विशाल करीत होता. एका एटीएमचा अंक सांगण्यासाठी विस्वास विशालला ५०० रुपये द्यायचा, तर बँक खात्यात पैसे अधिक असेल, तर १० टक्के कमिशनसुद्धा देत होता.
विस्वासचे बँक खाती गोठवली
विस्वासने शेकडोंच्या बँक खात्यावर डल्ला मारला. चंद्रपूर पोलिसांनी त्याच्याकडून ५६ हजारांची रोख जप्त केली. विसवासला या गोरखधंद्यातून ३० टक्के लाभ मिळायला, अन्य सर्व पैसे कमिशन व प्रवासी वाहतुकीवर तो करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यातून त्याने ६ लाखांची कमाई केल्याची कबुली दिली. ही रक्कम त्यापेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीच्या काळात मंदावला होता धंदा
विस्वास हा २००९ मध्ये शिक्षणासाठी दिल्लीत गेला. भाड्याने खोली घेऊन तो बहिणीसह राहत होता. मात्र, कालातंराने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीत प्रवेश केला. मात्र, नोटाबंदीच्या काळात त्याचा धंदा मदावला होता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.