सीआयडी चौकशी करा
By admin | Published: August 21, 2016 12:06 AM2016-08-21T00:06:37+5:302016-08-21T00:06:37+5:30
पिंपळखुटा येथील संत शंकर महराज आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळीसाठी गळा कापल्याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, ....
मागणी : एसएफआय, डीवायएफआय संघटनेचे तिवसा तहसीलवर धरणे
तिवसा : पिंपळखुटा येथील संत शंकर महराज आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळीसाठी गळा कापल्याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया या संघटनाद्वारा करण्यात आली.
यासाठी शनिवारी तिवसा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आश्रम परिसरात नरबळीसाठी प्रथमेशचा गळा चिरण्यात आल्यामुळे या सर्व प्रकाराला शंकर महाराजांसह त्यांची ट्रस्ट जबाबदार धरून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, आरोपी सुरेंद्र मराठे व त्याच्या साथीदारावर कठोर कारवाई करावी. शंकर महाराज आश्रम व ट्रस्टचे सर्व आर्थिक स्त्रोत व आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी. प्रथमेश व त्याच्या परिवाराच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण द्यावे, प्रथमेश सगणे व अजय वनवे या दोघांच्याही शिक्षणाची सोय अन्यत्र करावी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या शंकर महाराज आश्रम ट्रस्ट व त्यांच्याशी संबंधित सर्व संस्थांवर बंदी घालावी व आश्रमशाळा तसेच वसतिगृहाची समाजकल्याण विभागाने व शिक्षण विभागाने सखोल चौकशी करावी व प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राम लंके यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक शफीक शहा, अंकुश वाघ, सुनील राऊत, अभिजित भेलकर, ओमप्रकाश वाघमारे, प्रफुल्ल निकाळजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)