पांढरी घटनेची सीआयडी चौकशी करा : जोगेंद्र कवाडे यांची पत्रपरिषदेत मागणी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 13, 2024 09:49 PM2024-03-13T21:49:39+5:302024-03-13T21:50:10+5:30
‘त्या’ राजकीय शक्तीचा शोध घ्या
अमरावती: पांढरी खानमपूर येथील नागरिकांच्या आंदोलनात काही अवांच्छनीय व राजकीय हेतूसिद्धीसाठी लोक शिरले. यात कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा व घटनेची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केली.
कवाडे यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पांढरी खानमपूर येथील नागरिकांचे विभागीय आयुक्त कार्यालयावर चार दिवसांपासून आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दिरंगाई केली. त्यामुळे प्रकरण चिघळले व आंदोलनात अन्य लोकांनी शिरकाव केला. सामाजिक द्वेष निर्माण करून राजकीय फायदा घेण्याची शंका आहे. त्याच लोकांनी दगडफेक करून हिंसाचार घडवून आणला, याची चौकशी झाली पाहिजे, यामध्ये निर्दोष व्यक्तींना त्रास व्हायला नको, असे कवाडे म्हणाले.
मंगळवारी पांढरी ग्रामसभेने ठराव घेऊन यापूर्वीचे दोन्ही ठराव रद्द केले, असे कितपत योग्य आहे. जातीच्या नावाखाली सामाजिक प्रदूषण सुरू आहे. ‘पावसाने झोडपले, राजाने मारले, तर न्याय कोणाला मागायचा’, असा प्रकार असल्याचे कवाडे म्हणाले. पत्रपरिषदेला चरणदास इंगोले, विलास पंचभाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पांढरी ग्रामपंचायतच बरखास्त करा
पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने मंगळवारी घेतलेली आमसभा व त्यांनी रद्द केलेले यापूर्वीचे दोन्ही ठराव ही प्रक्रियाच नियमबाह्य आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायतच बरखास्त करा, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी पत्रपरिषदेत केली. ‘शिवशक्ती, भीमशक्ती प्रवेशद्वार’ असे नाव आपण प्रशासनाला सुचविले असल्याचे कवाडे म्हणाले.