‘डी मार्ट’च्या पार्किंगचा नागरिकांना त्रास
By admin | Published: March 7, 2016 12:08 AM2016-03-07T00:08:04+5:302016-03-07T00:08:04+5:30
कॅम्प भागातील डी मार्ट प्रतिष्ठानासमोर अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने या परिसरातील नागरिकांसह अन्य अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुटीच्या दिवशी सर्वाधिक गर्दी : हातगाड्यांची गर्दी, अतिक्रमणाचा विळखा
अमरावती : कॅम्प भागातील डी मार्ट प्रतिष्ठानासमोर अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने या परिसरातील नागरिकांसह अन्य अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने पोलिसांच्या सहकार्याने येथील अतिक्रमण उठवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
स्थानिक कॅम्प भागात असलेल्या डी मार्ट संकुलाजवळ चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था नसल्याने शंभरावर चारचाकी वाहने अगदी रस्त्यावर उभी राहतात. येथील नो-पार्किंगची फलके अक्षरश: शोभेचे वस्तू बनली आहेत. अनेक वाहन चालक फलकासमोरच पार्किंग करीत आहेत.
गाडगेनगर वाहतूक
विभागाने केली कारवाई
कॅम्प हा भाग वाहतूक शाखेच्या गाडगेनगर विभागांतर्गत येतो. त्यामुळे संबंधित वाहतूक पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी व वाहतुकीस शिस्त लावावी, अशी अपेक्षा आहे.
चारचाकींसमोर
दुचाकींची अवैध पार्किंग
डी-मार्ट समोरच्या खुल्या जागेत चारचाकी वाहनांच्या समोर दुचाकींच्या रांगा लावल्या जातात. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येथील अवैध पार्किंगमधील दुचाकी तथा चारचाकी वाहनांना जामर लावण्यात यावे, पोलिसांनी तशी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
समोरचा रस्ताही व्यापला
डी मार्टच्या समोरासमोरचा रस्तासुद्धा अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे. या भागात चप्पल-बुट विक्रेत्याने दुकानदारी थाटली आहे. रस्त्याच्या बाजूने जरी ही दुकानदारी असली तरी त्यामुळे लागणारी पार्किंग अवैधच ठरते. येथेही रस्त्यावर दुचाकी अस्ताव्यस्त लागतात. अनेक दिवसांपासून असलेल्या या भागातील अतिक्रमणावर हातोडा न फिरविल्याने काहीजण मुजोर बनले आहेत.