चांदूर बाजारात नागरिकांना सुरक्षित अंतरांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:16+5:302021-04-29T04:09:16+5:30
चांदूर बाजार : शासनाने आखून दिलेल्या संचारबंदीच्या नियमावलीनुसार दैनंदिन खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. अशात कोरोनाचा ...
चांदूर बाजार : शासनाने आखून दिलेल्या संचारबंदीच्या नियमावलीनुसार दैनंदिन खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अडचणीचे होत आहे, तर सुरू असलेल्या संचारबंदीतही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनी शासनाचा नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनातर्फे मोठ्या स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. याकरिता प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, नागरिकांच्या आडमुठेपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबेना असा झाला आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटाझजर आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री उपाययोजना महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी या त्रिसूत्रीप्रमाणेच वागावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे. परंतु निडर बनलेल्या नागरिकांना याचे काही सोयरसुतक नाही.
दररोज सकाळी ७ ते ११ दरम्यान स्थानिक बाजारपेठांमध्ये उसळलेल्या गर्दीवरून खरेच कोरोनाचा उद्रेक थांबेल का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात कहर केला आहे. जिल्ह्यातही या लाटेने पाय पसरले असून, आधी शहरापुरती मर्यादित असलेली ही लाट गावखेड्यात पोहोचली आहे. दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यातही आता ग्रामीण भागातील बाधित रुग्णांचा आकडा भर देत आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना ठरावीक वेळ दिली आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून प्रशासनाचा नियमावलीचे पालन करून भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणे गरजेचे झाले आहे. मात्र, शहरात एकाच जागी भाजी मंडई व बाजार असल्याने मोठी गर्दी गोळा होताना दिसत आहे. या ठिकाणी दुकानदारांतर्फे कोणतीही सुरक्षा, सुविधा न बाळगता भाजीपाला विक्री होत असल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. त्यात अनेक नागरिक नियमांना पायदळी तुडवून बेभान वावरत आहेत. तथापि, यामुळे खरोखरच कोरोनाला आपण रोखू शकणार का, हा प्रश्न काही सुज्ञ नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विनामास्क दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे केली जात आहे.
---------------------
तेव्हाच होणार व्यापार मुक्त
जोवर कोरोनाचा रुग्ण संख्येत कमतरता येत नाही, तोपर्यंत शासनसुद्धा संचारबंदी उठविणार नाही. हे कठोर सत्य असून, नागरिकांनी साथ दिल्यास लवकरच रुग्णसंख्येचा आकडा आटोक्यात येईल आणि तेव्हाच व्यापारीची संचारबंदीतून मुक्तता होईल.