शासकीय कार्यालयांमध्ये एक तास जेवणासाठी पण नागरिकांना राहावे लागते दोन तास ताटकळत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:29 IST2025-03-31T13:28:38+5:302025-03-31T13:29:47+5:30
Amravati : कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कालावधीत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र

Citizens have to wait for two hours in government offices for work, while employees take a lunch break of hours
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विविध कामानिमित्त आलेले नागरिक यांना ताटकळत राहावे लागू नये, यासाठी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची वेळ निश्चित केलेली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात भोजन अवकाशात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीषेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील असो की, शहरातील नागरिकांना विविध कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे लागते. यात जर त्यांना पोहोचण्यास उशिर झाला. दुपारचे एक वाजले की याठिकाणी दुपारच्या जेवणाची वेळ होते. अनेक ठिकाणी टेबल ओढले जातात. एकमेकांची प्रतीक्षा केली जाते व नंतर जेवन यामध्ये किमान तासभराचा वेळ जातो. काही ठिकाणी जरा जास्तच वेळ जातो.
सरकारी कार्यालयात वेळापत्रकाचा अभाव
सरकारी कार्यालयांमध्ये बहुतेक ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची वेळ लिहिलेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना दुपारी थोडा जरी उशीर झाला, तर लंच टाइमचा फटका बसतोच. त्यांना तासभर प्रतीक्षेत राहावे लागते.
जेवणाची वेळ दीड ते दोनची
शासकीय कार्यालयांमध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान अर्धा तासाची वेळ ही जेवणाची निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात अनेक कार्यालयात दुपारी अडीचनंतरच जेवन अवकाश झाल्यानंतर कामकाज सुरू होत असल्याचे दिसून येते.
सर्वसामान्यांची अडचण
अनेकदा ग्रामीण भागातून कामानिमित्त जिल्हा कार्यालयात येणारे नागरिक दुपारी १ च्या आत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत थांबावे लागते.
प्रत्यक्षात कर्मचारी दोन तास गायब
काही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रीकची अडचण नसल्याने जरा फुरसतनेच कार्यालयात येतात. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रचंड काम असते. सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर तासभर तरी काम सुरूच असल्याचे दिसून येते. अनेकदा सुटीच्या दिवशीही ते ऑफीसला येतात, त्यामुळे कामातून वेळ मिळाल्यानंतर ते जेवण करताना दिसतात. ज्या कार्यालयात बायोमेट्रीक मशीन नाही, तिथे कार्यालयात येण्यापासून ते दुपारचे जेवण व सायंकाळी घरी जाण्याची वेळ कधीही पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. याकडे तेथीळ विभागप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
"सहकार विभागात कामानिमित्त आलो असता, दुपारी अडीचपर्यंत संबंधित कर्मचारी टेबलवर नव्हते. जेवण्यासाठी घरी गेल्याचे सांगण्यात आले."
- प्रशांत वानखडे, अमरावती
"जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलो असता दुपारी लंच टाइम होता. त्यानंतर तीनपर्यंत संबंधित कर्मचारी आलेच नाही. कृषी विभागातही असाच अनुभव आहे."
- गणेश ठाकरे, मोर्शी