नागरिकांची तहसील कार्यालयावर धडक
By admin | Published: September 30, 2016 12:28 AM2016-09-30T00:28:02+5:302016-09-30T00:28:02+5:30
पंतप्रधान आवास योजनेतून गरजवंतांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयावर
मागणी : गरजूंची नावे घरकूल योजनेत समाविष्ट करा
नांदगाव खंडेश्वर : पंतप्रधान आवास योजनेतून गरजवंतांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम शहीद विकास उईके या जवानास श्रद्धांजली वाहण्यात आली.
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे. सन २००२ मधील प्रतिक्षा यादीतील नावे पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करणे, ग्रामरोजगार सेवक, आशा वर्कर, ग्रंथालयीन कर्मचारी यांना किमान वेतन देणे, तसेच सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी तयार करण्यात आली त्यामध्ये अनेक गरजवंतांना वगळण्यात आल्याने त्या गरजवंतांना परत यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना दिले. यावेळी पं. स. सदस्य सुधाकर डोंगरे, मारोती नेवारे, रत्नकला मेश्राम, सविता नेवारे, विलास पुळकर, प्रकाश ढगे, निवृत्ती जगताप, धनराज राठोड, मोहन वाडेकर, भावराव राऊत यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)